जिल्हा उपनिबंधक खरे ३० लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई : सहकारातील मोठा मासा लागला गळाला
नाशिक (बारामती झटका)
नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संचालक पदी निवडून आल्यानंतरही त्याच्या निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत लाचेची रक्कम स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटने त्यांच्या राहत्या घरात पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक युनिटच्या पथकाने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (वय ४०, रा. आई हाइट्स, कॉलेज रोड) यांच्यासह ॲड. शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय ३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) यांना ३० लाख रुपयांची मागणी करून सतीश खरे यांच्या कॉलेज रोड येथील निवासस्थानी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.
नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण निहाळदे व पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वातील सहाय्यक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने ही कारवाई केली असून सोमवारी (दि. १५) उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाचखोरीचा घटनाक्रम
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार विभागातील तीन अधिकाऱ्यांना मागील दोन महिन्यात रंगेहात पकडले आहे. सहकार विभागात भ्रष्टाचार फोफावला असल्याचे वास्तव समोर आले.
- विशेष म्हणजे एकाच पदावरील दोन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मार्च महिन्यात कारवाई केली होती. यात दि. २ मार्चला तत्कालीन सिन्नर सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांना १५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.
- त्याच जागेवर निफाडचे सहाय्यक निबंधक रणजीत पाटील यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला असताना त्यांनाही दि. ३० मार्च रोजी २० लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. या घटनाक्रमात सोमवारी (दि. १५) लाचलुचपत विभागाने तब्बल ३० लाखांची लाच स्वीकारताना सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांनाही रंगेहात पकडले आहे.
वर्ग – १ चे हे लाचखोर अधिकारी चर्चेत
आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले होते. भूमी अभिलेखचे वर्ग – १ चे अधिकारी जिल्हा अधीक्षक महेशकुमार महादेव शिंदे (वय ५०) यांनी ५० हजारांची लाच ३१ जानेवारी २०२३ रोजी स्वीकारली होती. यापूर्वी २०२१ साली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी वैशाली वीर-झनकर यांनी त्यांच्या चालकामार्फत ८ लाखांची लाच घेतली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Loved this article! It’s both insightful and entertaining. For more, check out: EXPLORE FURTHER. What are your thoughts?