पत्रकारांनी निर्भीडपणे पुढे येण्याची गरज -भीमराव आंबेडकर
अकलूज येथे मूकनायक परिसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
अकलूज (बारामती झटका)
मूकनायकमुळे अबोल असलेली माणसे बोलू लागली. साहित्य निर्मितीला अंकुर फुटले. आज पत्रकारीतेचे अंग कुठेतरी कमी पडताना दिसत आहे, यासाठी व्यवस्थेला हादरे देण्यासाठी पत्रकारांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले.
अकलूज येथे मूकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने दि. ४ फेब्रुवारी रोजी मूकनायक या वृत्तपत्राच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अभ्यासक, विचारवंत सत्येंद्र चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील, भंते बी सारीपुत्त आदिसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मूकनायकची निर्मिती करून डॉ. आंबेडकरांनी लोकांना बोलते केले. लोकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. त्यामुळे शोषित पिडीतांना न्याय मिळाला.

यावेळी व्याख्याते डॉ. सत्येंद्र चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या भाषेतून इतिहासाचा परामर्श घेत अनेक संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भीमा कोरेगाव आदी विषयांचा उलगडा केला. महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास याबाबतचे त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजू लोहकरे व अशोक कांबळे यांना पत्रकारितेतील आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या शासकीय संस्थेकडून पुस्तकाचा स्टॉल उभारण्यात आला होता. त्याचबरोबर खाजगी पुस्तकेही या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होती. यावेळी जवळपास १ लाख ७७ हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. या ठिकाणी भरवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूकनायक कृती समितीचे नागेश लोंढे, आनंदकुमार लोंढे, बाळासाहेब गायकवाड, डी. एस. गायकवाड, गौतम भंडारे, सागर खरात, कैलास कांबळे, सुजित सातपुते यांनी परिश्रम घेतले. सदर मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमास परजिल्ह्यातील लोकांची उपस्थिती देखील पहावयास मिळत होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng