अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेने एकमेकावर “दंड” थोपटणारे झाले “थंड”

मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा “तुतारी”.
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची गतवर्षीची सर्वसाधारण सभा वादळी, गोंधळाची व चर्चेची ठरलेली होती. सदरच्या सभेनंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक उत्तमराव जानकर, धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या समवेत घोषणाबाजी करीत दंड थोपटलेले होते. लोकसभा निवडणुकीवेळी माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा “तुतारी”, अशी सध्याची राजकीय परिस्थिती झालेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सर्वसाधारण सभा आहे. सदरच्या सभेत एकमेकांवर दंड थोपटून थंड झाले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर झाले. नंतर त्यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविषयी आवाज उठवलेला होता. त्यामध्ये घोडेबाजार, पोट भाडेकरू, कामगारांचा प्रश्न, साफसफाई महिला कर्मचारी अशा अनेक विषयांवर मुद्देसूद समाज माध्यमातून आवाज उठवण्याचे काम सुरू होते अंतर्गत चालणारा कारभार चव्हाट्यावर येत असल्याने माळशिरस तालुक्यात वेगळी चर्चा सुरू होती. कार्यकर्ते एकमेकांवर अपशब्द व शिव्यांचा भडिमार करत होते, तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण बारामती झटका यूट्यूब चॅनल वर प्रसारित केले होते. सर्वसाधारण सभेच्या वेळी भारत-पाकिस्तान युद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती.
लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गट व उत्तमराव जानकर गट एकत्र आलेले आहेत. त्यानंतर पहिलीच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा आहे. सर्वसाधारण सभा खेळीमेळीत नव्हे तर मिळमिळीत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.