पाऊले चालती पंढरीची वाट, चालता चालता करू हॉटेल माऊली येथे शॉवरखाली पहाटेचे अभ्यंगस्नान…..
माऊली हॉटेलचा माऊलींच्या भाविक भक्तांसाठी अनोखा उपक्रम राबवून जलसंवर्धन करण्याचा यशस्वी प्रयत्न
मांडवे ( बारामती झटका )
कैवल्य साम्राज्य संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक भक्तांसाठी पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील मांडवे गावच्या हद्दीतील मोरे परिवार यांनी हॉटेल माऊलींच्या माध्यमातून माऊलीच्या भक्तांसाठी अनोखा उपक्रम राबवून पाण्याचे जलसंवर्धन करण्याचा यशस्वी प्रयोग केलेला असल्याने भाविकभक्त समाधान व्यक्त करून आनंदाने स्तुत्य उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
मांडवे गावातील प्रगतशील बागायतदार व सांप्रदायिक श्री. महादेव दामोदर मोरे रा. मांडवे यांनी स्वतः आळंदी ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे. पंढरीची वारी करीत असताना वारकरी बंधू वैष्णव यांना पालखीचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी आंघोळीसाठी स्नानगृहे उपल्बध नसतात किंवा खराब पाण्यात आंघोळ करावी लागते, हे त्यांनी अनुभवले आहे.मांडवे गाव पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर आहे. यामुळे या पालखी महामार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ माऊली ज्या वाटेने पंढरपूरला जातात त्या मार्गावर असणाऱ्या गावात जन्म झालेले खूप नशीबवान समजत आहेत.मोरे परिवारामध्ये आध्यात्मिक वारसा जपला जात आहे. सेवाभावी वृत्तीची भावना मनात ठेवून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल माऊली ॲन्ड फॅमिली रेस्टॉरंट मांडवे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनीस ताज्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि आंघोळीची सोय शॉवरच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे. याचा उपभोग वैष्णव आनंदाने घेत आहेत. पाच ते दहा मिनिटात 40-50 वारकरी बंधू स्नान करू शकतात, असे हॉटेलचे मालक व आध्यात्मिक वारसा जपणारे श्री. महादेव दामोदर मोरे यांनी सांगितले.
पर्यावरणाचा समतोल राखून जलसंवर्धन करण्याचा अनोखा प्रयोग केलेला आहे. आंघोळीचे पाणी वाहून जाऊ नये, मातीची पाण्यामुळे धूप होऊ नये, पाणी मूलस्थानी झिरपून जावे, यासाठी दोन फूट खोल व २५ फूट लांबीचा चर खोदून जल संवर्धनसुद्धा होत आहे. हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी लहान बंधू अर्जुन मोरे व बापूराव मोरे यांचे सहकार्य मिळाले, असे हॉटेल मालक यांनी सांगितले. तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणात असे उपक्रम माऊलींच्या भक्तांसाठी राबविणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर या पालखी महामार्गावर नेहमी आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी अशा चार प्रमुख वारीसह नेहमी दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू असते. पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर हॉटेल माऊली अँड फॅमिली रेस्टॉरंट (शुद्ध शाकाहारी) मोरे परिवार यांचे आहे. कायम वैष्णवांचे हक्काचे ठिकाण आहे. मोरे परिवार आणि वैष्णवांचे अतूट नाते बनलेले आहे. पालखी सोहळ्यातील स्तुत्य उपक्रमाचे वारकरी व भाविक भक्त वैष्णव यांच्यामधून समाधान व्यक्त करून आंघोळीचा आनंद घेण्याचे सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng