पानीव-माळशिरस शिवेचा रस्ता प्रश्न अखेर मार्गी

आमदार राजेंद्र राऊत यांच्या निधीतून २५ लाख; प्रकाश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पानीव (बारामती झटका)
पानीव-माळशिरस शिवेवरील तब्बल ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आमदार राजेंद्र राऊत यांच्या निधीतून या रस्त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांच्यासह अॅड. अभिषेक पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
ब्रिटिशकालापासून या भागात रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणामुळे मार्ग अधिकच अडचणीचा झाला होता.

विशेषतः पावसाळ्यात या भागातून ये-जा करणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या प्रश्नावर यापूर्वीही प्रयत्न झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कार्यकाळात प्रकाश पाटील यांच्या पुढाकाराने मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यानही हा रस्ता मार्गी लावण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र निधीअभावी काम रखडले होते.
अखेर अॅड. अभिषेक पाटील यांनी या प्रश्नाकडे विशेष लक्ष देत प्रशासन तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार राऊत यांच्या निधीतून २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे २०० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतात ये-जा करणे तसेच शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माळशिरसकडे विशेष लक्ष
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, पानीव हे जिल्ह्यात इतिहास घडविणारे गाव आहे. येणाऱ्या काळात पानीवसह माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



