पैशाअभावी कायदेशीर मदत थांबणार नाही!

गरजू नागरिकांसाठी ‘विधी सेवा फाउंडेशन’चा पुढाकार; मोफत कायदेविषयक मार्गदर्शनासह कायदेशीर प्रतिनिधित्वासाठीही प्रयत्न
माळशिरस (बारामती झटका)
“कायदा माहिती नाही म्हणून हक्क गमावू नका आणि पैशाअभावी न्यायापासून वंचित राहू नका!” या उद्देशाने विधी सेवा फाउंडेशन, माळशिरस यांच्या वतीने नागरिकांसाठी कायदेविषयक जनजागृती आणि कायदेशीर मदतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची तसेच कायदेशीर प्रक्रियेची सोप्या भाषेत माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणीही कायदेशीर मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी फाउंडेशन कार्यरत आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार कशी नोंदवावी, FIR नंतरची प्रक्रिया काय असते, चार्जशीट म्हणजे काय, न्यायालयीन प्रकरणाची प्रक्रिया कशी चालते, नोटीस किंवा समन्स मिळाल्यानंतर काय करावे, तसेच तक्रारदाराचे कायदेशीर अधिकार कोणते, याबाबत अनेक नागरिकांमध्ये अद्याप पुरेशी माहिती नसते. त्यातच आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे वकिलांची फी देणे शक्य न झाल्याने काही नागरिक कायदेशीर मदतीपासून दूर राहतात.
ही बाब लक्षात घेऊन विधी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत प्राथमिक कायदेविषयक मार्गदर्शन देण्याबरोबरच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र व्यक्तींना उपलब्धतेनुसार मोफत कायदेशीर प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
⚖️ कायदेविषयक मार्गदर्शनाचा उपक्रम
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आवश्यक प्राथमिक कायदेविषयक माहिती व मार्गदर्शन देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. समस्या निर्माण झाल्यानंतर कायदेशीर मदत घेण्यापेक्षा नागरिकांनी त्यांचे हक्क, कर्तव्ये आणि कायदेशीर पर्याय यांची माहिती आधीपासूनच करून घ्यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
FIR ते चार्जशीट; कायदेशीर प्रक्रियेची सोप्या भाषेत माहिती
फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती कार्यशाळांमध्ये नागरिकांना पुढील विषयांबाबत मार्गदर्शन केले जात आहे—
▪️ FIR म्हणजे काय आणि ती कशी नोंदवावी?
▪️ FIR नंतर पोलिस तपासाची प्रक्रिया काय असते?
▪️ चार्जशीट म्हणजे काय?
▪️ तक्रारदाराचे कायदेशीर अधिकार कोणते?
▪️ नागरिकांचे घटनात्मक अधिकार व कर्तव्ये कोणती?
▪️ पोलिस व न्यायालयीन प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी?
▪️ कायदेशीर नोटीस, समन्स किंवा न्यायालयीन कागदपत्रे मिळाल्यानंतर काय करावे?
गावागावात कायदेविषयक जनजागृती
कायद्याची माहिती केवळ वकील किंवा न्यायालयीन क्षेत्रापुरती मर्यादित न राहता ती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम, शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन फाउंडेशनने केले आहे.

महिला, विद्यार्थी व वंचित घटकांसाठी विशेष उपक्रम
महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कायदेशीर माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे फाउंडेशनचे नियोजन आहे.
“प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. योग्य वेळी मिळालेले कायदेविषयक मार्गदर्शन अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच टाळण्यास मदत करू शकते. कायदेविषयक जनजागृती ही सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाची पायरी आहे,” अशी भूमिका विधी सेवा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
माळशिरस परिसरातील गरजू नागरिकांना कायदेशीर मदत मिळावी, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कायद्याची माहिती पोहोचावी आणि न्यायव्यवस्थेची प्रक्रिया सामान्य नागरिकांना समजावी, या उद्देशाने विधी सेवा फाउंडेशनने आपल्या कार्याला सुरुवात केली आहे.

गरजू नागरिकांनी कायदेविषयक मदत व मार्गदर्शनासाठी ९९७०९४४९९१ या संपर्क क्रमांकावर किंवा vidhisevafoundation@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. सुमित सावंत यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



