पंढरपूरच्या आयआयटी कॉम्प्युटर्सचा राज्यात डंका…

सलग सहा वर्षे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून गौरव; एमएस-सीआयटी प्रवेशात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
पंढरपूर (बारामती झटका)
संगणक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंढरपूर येथील आयआयटी कॉम्प्युटर्सने यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा राज्यस्तरावर मानाचा सन्मान मिळविला आहे. सन २०२६ मध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेला विशेष प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, संस्थेने सलग सहा वर्षे हा सन्मान मिळविण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच एमएस-सीआयटी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रवेश नोंदविल्याबद्दल संस्थेला महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे संगणक प्रशिक्षण केंद्र म्हणूनही गौरविण्यात आले आहे.
सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पतोडी व अमित रानडे, लातूर प्रादेशिक शिक्षण केंद्राचे महेश पत्रिके आणि सोलापूर जिल्हा व्यवस्थापक रोहित जेऊरकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने नितीन आसबे, दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे आणि वैष्णवी पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक प्रशिक्षण संस्थांचे संचालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी आयआयटी कॉम्प्युटर्स सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या या यशामागे संचालकांचे मार्गदर्शन, शिक्षक व कर्मचाऱ्यांची मेहनत, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे.
या दुहेरी यशामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



