ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीच्या अकलूज शहर अध्यक्षपदी किसन नागनाथ शिंदे यांची नियुक्ती…

भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार – किसन शिंदे…

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या अकलूज शहर अध्यक्षपदी किसन नागनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

12 वर्षांचा कावळे यांचा कार्यकाळ!
भारतीय जनता पार्टी अकलूज शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी महादेवराव कावळे यांनी यशस्वीपणे बारा वर्ष सांभाळलेली आहे. महादेव कावळे यांच्या कार्यकाळामध्ये प्रतिकूल परिस्थितीत भाजप पक्ष टिकवून ठेवण्याचे काम केलेले आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव कावळे शहर अध्यक्ष असताना अकलूज नगर परिषदेची निवडणूक झालेली होती. सदरच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आलेले होते. नगराध्यक्ष यांना दहा हजाराच्या वर मते पडलेली होती.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत किसन नागनाथ शिंदे नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे राहिलेले होते. किसन शिंदे यांचा निसटता पराभव झालेला होता. निवडणुकीनंतर किसन शिंदे यांच्याकडे अकलूज शहर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली होती. ओबीसी मोर्चाची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली होती. 12 वर्षाच्या कालावधीनंतर अकलूज शहर अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी किसन शिंदे यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिलेल्या होत्या. अखेर किसन शिंदे यांच्या नावावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब करून अकलूज शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.

काय म्हणाले नवनिर्वाचित अध्यक्ष?
किसन नागनाथ शिंदे यांनी अकलूज शहर अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी दिलखुलास चर्चा करताना सांगितले, “महादेव कावळे यांनी अकलूज शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून पक्ष वाढवण्याचे काम केलेले आहे. त्यांच्याच विचारावर व पावलावर पाऊल ठेवून सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

“पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते व भारतीय जनता पार्टीचे तालुका, जिल्हा पदाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करून कार्यकर्त्यांचा समन्वय ठेवणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहरांमध्ये कार्यालय सुरू करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे. सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असून जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची आहे. शासकीय योजनांचा व व्यक्तिगत सर्वसामान्य जनतेला फायदा होईल यासाठी कायम प्रयत्न राहील,” असे नवनिर्वाचित अकलूज शहराध्यक्ष किसन शेठ यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button