जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचा पदभार काढा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बालिश प्रशासनावर संपूर्ण सभागृह चिडले अध्यक्ष, उपाध्यक्ष बघतच राहिले.
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनुभव कमी आणि नवीन शिकाऊ अधिकाऱ्यांचा भरणा भरल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात गोंधळ उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आला.
नव्याने आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची ही तिसरी किंवा चौथी सभा होती. सभेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सदस्य आक्रमक पाहायला मिळाले. सुरुवातीचे दोन ते अडीच तास दुष्काळी पाणीटंचाई आणि चारा नियोजनावर गदारोळ झाला. त्यानंतर सभेच्या अजेंड्यावरील विषयाला सुरुवात झाली. तत्पूर्वी मागील सभेचा इतिवृत्तान्ताला मंजुरी द्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अण्णा ढाणे यांनी पूर्ण इतिवृत्त वाचून मंजूर केल्याशिवाय आम्ही सभा पुढे चालू देणार नाही अशी भूमिका घेतली.

त्यामुळे सुरुवातीपासून विषयवार अनुपालन अहवालावर चर्चा करण्याचे ठरले. पहिलाच विषय मंगळवेढ्याच्या भाजप सदस्या करुणा शिवशरण यांचा आरोग्याचा होता. त्यावर चर्चा सुरू असतानाच अनुपालन अहवाल मिळालेल्या अनेक सदस्यांनी पाने चाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सदस्यांचे विषय या अहवालात घेतलेच नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यामध्ये राष्ट्रवादीचे आक्रमक सदस्य अण्णा ढाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती लोंढे, अक्कलकोटचे शिवराज मेहेत्रे, प्रवीण तानवडे, दादासाहेब लवटे यांच्यासह अनेक महिला सदस्य उठून उभा राहिल्या. जाणीवपूर्वक आमचे विषय या अनुपालन अहवालात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याप्रकरणी विचारले. प्रत्येक सभेला सचिव बदलला जातो, त्यामुळे सभेचे गांभीर्य कुणालाच नाही. नेमके काय चालते हेच कुणाला कळत नाही. एकाच अधिकाऱ्यावर किती चार्ज देता त्यांना झेपत नाही म्हणून नकळत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्याकडील प्रभारी चार्ज काढावा असेही काहींनी सभेत बोलून दाखवले.

यापूर्वीच्या सभेतील सचिव प्रसाद मिरकले हे या सभेचे सचिव सूर्यकांत भुजबळ यांच्याकडे आले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही अनुपालन अहवाल बघितला. यावेळी सभागृहात प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आले. काय चाललंय हे कुणाला समजेना. अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार तर हे इकडे तिकडे बघतच राहिले त्यांना आता काय बोलावे हे समजले नाही.

दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी मागील सभेचा इतिवृत्तान्त आणि अनुपालन अहवाल चाळला असता इतिवृत्तांमध्ये सदस्यांनी मांडलेले विषय होते. परंतु तेच विषय सभेच्या पुढील अनुपालन अहवालात आले नाहीत हे समोर आणले. यापुढे सात दिवस अगोदर अनुपालन अहवाल सदस्यांना दिला जावा असे ठरले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



