तेल गेले, तूपही गेले, हातात धुपाटणे आले… मोहिते-पाटील यांची जिल्हा बँक निवडणुकीत दयनीय अवस्था!

जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 10 संचालक मोहिते-पाटलांच्या नाकावर टिच्चून बिनविरोध!
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले 10 संचालक –
सोसायटी मतदार संघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, बाळराजे पाटील, डॉक्टर पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभुराजे जगताप, तर इतर मागास प्रवर्गातून ओबीसी अजिंक्यराणा पाटील हे 10 सदस्य बिनविरोध आलेले आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दहा सदस्य मोहिते-पाटील यांच्या नाकावर टिच्चून बिनविरोध निवडून आलेले आहेत. तेल गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी मोहिते-पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दयनीय अवस्था झालेली आहे.
मोहिते-पाटलांनी दोन्ही अर्ज मागे घेतले!
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पणन आणि दुग्ध संस्था अशा दोन्ही मतदार संघांतून दाखल केलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तत्पूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचाही अर्ज आधीच बाद झाला होता आणि त्यांना न्यायालयातूनही दिलासा मिळाला नव्हता.
238.43 कोटींच्या नुकसानाचा ठपका!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणी मोहिते-पाटील कुटुंबावर मुख्यत्वे बेकायदेशीर कर्जवाटप, आर्थिक अनियमितता आणि बँकेच्या कारभारात गैरव्यवस्थापन केल्याचे आरोप आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये सादर झालेल्या डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्या चौकशी अहवालानुसार मालमत्तेच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप करणे, कर्जवसुलीत हलगर्जीपणा आणि गैर व्यवस्थापन यामुळे बँकेचे 238.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 32 संचालकांना जबाबदार धरण्यात आले असून, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर 30.05 कोटी रुपयांच्या वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने 2018 मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमला होता. सहकार कायदा कलम 88 आणि 110 अ नुसार झालेल्या कारवाईमुळे 2026 च्या जिल्हा बँक निवडणुकीत माजी चेअरमन तथा माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आहे.

गोरे यांना टार्गेट करूनही डाव फसला !
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू झाल्यापासून मोहिते-पाटील परिवार यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टार्गेट केलेले होते. जिल्ह्यातील स्थानिक नेते “आमची बँक, आम्ही निर्णय घेऊ” अशा वल्गना करून जिल्ह्यातील नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला होता. मात्र जिल्ह्यातील डीसीसी बँकेमध्ये चेअरमन राहिलेले दिग्गजांचे वारसदार यांनी मोहिते-पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणनीती आखलेली होती. त्यामध्ये अनेक दिग्गजांचे वारसदार, विद्यमान आमदारांना प्राधान्य मिळालेले आहे.
माळशिरस तालुक्यात सोसायटी मतदार संघावर मोहिते-पाटील यांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. सदरच्या ठिकाणी मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल कडून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



