प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून कर्तुत्वाने तरुण पिढी पुढे येत आहे – धैर्यशील मोहिते पाटील
शिवनिर्णय संघटना अकलूज व महाराष्ट्र वीरशैव सभा माळशिरस तालुका यांच्यावतीने जिद्द पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अकलूज (बारामती झटका)
शिवनिर्णय संघटना अकलूज व महाराष्ट्र वीरशैव सभा माळशिरस तालुका यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या जिद्द पुरस्कार सोहळ्याचे वितरण शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आयुष्याच्या प्रवासात जिद्दीने आणि कष्टाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षमय लढा देऊन यशाच्या दिशेने उत्तुंग भरारी घेणाऱ्या अकलूज पंचक्रोशीतील डॉ. संतोष दोशी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेशजी कोतमिरे, शशिकला जाधव, मुस्तफा कापडिया (भोरी), गिरीजा खोचरे, शिवाजी दोरकर, विठ्ठल खंदारे, डॉ. शिवराज धोत्रे, जावेद तांबोळी या यशस्वी नागरिकांचा या पुरस्कार सोहळ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून समाजामध्ये आपल्या कर्तुत्वाने नवीन पिढी पुढे येताना दिसत आहे. ज्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले, समाजातील अशा हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेशजी कोतमिरे म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक पुरस्कार मिळतात. परंतु, मी ज्या मातीत जन्मलो, मोठा झालो, त्या मातीतल्या लोकांकडून माझ्या घरच्या लोकांकडून माझा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. घरची परिस्थिती चांगली नव्हती परंतु, आई-वडिलांची मी खूप शाळा शिकावी अशी इच्छा होती. आई वडिलांच्या प्रेरणेमुळे व जिद्दीमुळे मी यश मिळवू शकलो. यावेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, पुरस्कार म्हणजे एक शगुन आहे. ज्यांना मोहिते पाटलांच्या हस्ते पुरस्कार मिळतो त्यांची भरभराट होते. अकलूजला आल्यानंतर घरी आल्यासारखा वाटतं. आजही सामाजिक संघटना आपली समाजाशी असलेली बांधिलकी जपत अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून कोणकोणत्या आजारावर मदत मिळू शकते व त्यासाठी काय केलं पाहिजे, याची सविस्तर माहिती देऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन यावेळेस चिवटे यांनी दिले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, करमाळा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महेश साठे, दीपकराव पाटणे, फातिमा पाटावाला, निवेदिका श्वेता हुल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवनिर्णय संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हा युवा अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी प्रास्ताविकात संघटनेने केलेल्या कामाबद्दल माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महादेव पाटील, सुहास उरवणे, संदीप नरुळे, आकाश कापसे, उमेश गुळवे, जालिंदर लिगाडे, महेश शेटे, वैष्णवी शेटे, देविदास राजमाने, प्रशांत चिंचकर आदींनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng