कृषी अधिकारी ५० हजारांची लाच घेताना अटकेत

गाडीत सापडले सहा लाख रुपये; जळोली (ता. पंढरपूर) येथे कारवाई
टेंभुर्णी (बारामती झटका)
खत व शेती औषधे निर्मितीच्या कंपनीतील सॅम्पल घेऊन यावर तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याकरिता ५० हजाराची लाच घेणाऱ्या पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यासह अन्य एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई जळोली (ता. पंढरपूर) येथे करण्यात आली. तपासणीत अधिकाऱ्याच्या गाडीत ६ लाख १४ हजारांची रक्कम ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली.
तंत्र अधिकारी आलोसे दत्ता नारायण शेटे (वय ४२, नेमणूक विभागीय कृषी सह संचालक कार्यालय, पुणे) व खासगी इसम प्रमोद वाल्मीक सुरवसे (३९, हरीहर महाराज मठाजवळ, पंढरपूर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदाराची खते व शेती औषधे निर्मितीची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतील उत्पादन झालेली खते व शेती औषधांचे सॅम्पल तंत्र अधिकारी शेटे याने घेतले होते. कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्याकरिता शेटे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याअनुषंगाने स्वतः रक्कम घेऊन खासगी इसम प्रमोद सुरवसे यांच्याकरवी त्यांच्या शासकीय वाहनामध्ये ठेवत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना पकडले.

लाच रक्कम मिळून आलेल्या शासकीय वाहनाची झडती घेतली असता या शासकीय वाहनामध्ये लाच रकमेव्यतिरिक्त एकूण ६ लाख १४ हजार रुपये मिळून आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, अंमलदार अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांनी पार पाडली.
पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार, यांनी कारवाई केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.