माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आजपासून रुजू झाले …
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदी डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नियुक्ती झाली होती, ते आजपासून कामावर रुजू झाले आहेत. नूतन गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांचा माळशिरस पंचायत समिती कार्यालयात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व माळशिरस पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री. मनोज बापूराव राऊत यांची प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद धाराशिव येथे बदली झाल्यानंतर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून डॉ. आबासाहेब हरी पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. आबासाहेब हरी पवार गटविकास अधिकारी ,पंचायत समिती वाळवा, जि. सांगली, येथे कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव डॉ. शर्मिला जोशी यांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदावर बदलीने नेमणूक केलेली होती.
डॉ. आबासाहेब हरी पवार यांचे पशु वैद्यकीय शास्त्रात एम.व्ही.एस.सी. (M.V.Sc.) शिक्षण झालेले आहे. २००१ च्या बॅचमधील एमपीएससी मधून त्यांची निवड झालेली आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, कागल, सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केलेले आहे. माळशिरस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत मोरे यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पदाचा पदभार गेल्या आठवड्यापासून होता. आज कायमस्वरूपी गटविकास अधिकारी डॉ. श्री. आबासाहेब हरी पवार रुजू झालेले आहेत.