सत्ताधारी मोहिते पाटील गटाची अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारात आघाडी…
नातेपुते ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या प्रचाराचा शुभारंभ १६ एप्रिल २०२३ रोजी शिवरत्न बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, सर्व उमेदवार, मतदार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला होता.
प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर मदनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे यांच्यासह अनेक उमेदवारांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गावागावात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी व प्रचारसभा घेऊन प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे.
सत्ताधारी मोहिते-पाटील गटाच्या पॅनलची जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी रणनीती आखलेली आहे. गावोगावी उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केलेला आहे.
विरोधी गटाकडून २१ एप्रिल २०२३ रोजी प्रचाराचा शुभारंभ अकलाई देवीस श्रीफळ वाढवून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व उमेदवार, मतदार, प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. विरोधी गटांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून प्रचारास सुरुवात करतील, अशी राजकीय वर्तुळात शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी सत्ताधारी मोहिते पाटील गटाने प्रचारात आघाडी घेतलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng