Uncategorizedताज्या बातम्या

सर्पमित्र प्रकाशभैय्या गायकवाड यांची सापाविषयी माहिती, सर्प दंश झाल्यास काय करावे…

आज १६ जुलै, जागतिक सर्प दिनानिमित्त….

सातारा ( बारामती झटका)

साप..!! हा शब्द कधीही ऐकला तरी नैसर्गिकरित्या आधी आपण घाबरतो. त्यानंतर उत्कंठा/कुतूहल निर्माण होते. मुळात आपल्याच नाही तर जगभरात जिथे जिथे साप आढळून येतात, तेथील प्रत्येकाची अशीच प्रतिक्रिया असते. याला कारण, पुराणकाळापासून कथा, कादंबऱ्या आणि नंतर टीव्ही वरील चित्रपट आणि मालिका यांमधून सापांना धोकादायक, सूडबुद्धीचे जीव असेच बिंबविले आहे. त्यामूळे साप आढळला की एकतर आपण घाबरून पळून जातो किंवा त्याला मारायला धावतो.

पण मित्रहो, एक गोष्ट आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे की, सगळे साप आपल्याला डसून मारायला बसलेले नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त थोडी खबरदारी आणि सावधानता बाळगली की, आपण सर्पदंश आणि विषारी दंशापासून होणाऱ्या समस्यांपासून वाचू शकतो.
तर या निसर्गचक्र आणि अन्नसाखळीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या जीवांबद्दल थोडी अधिक माहिती घेऊ.
पृथ्वीवरील बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश वगळता जगभरात साधारण ३५०० प्रजातीचे साप आढळून येतात. आपल्या भारतात ३०० पेक्षा जास्त सर्प प्रजाती आढळतात. यात ६० प्रजाती या विषारी आणि त्या ६० पैकी फक्त २५ समुद्र सर्प प्रजाती आणि काही जमिनीवरील हलक्या विषारी जाती सोडता फक्त बोटांवर मोजण्याएढ्याच जहाल विषारी प्रजाती आढळतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या वैद्यकदृष्ट्या महत्वाच्या चार प्रमुख प्रजाती आहेत. यांच्या दंशाने मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सोबत चापडा, मलबारी चापडा, नागराज, पोवळा, पट्टेरी मण्यार या विषारी प्रजाती आढळतात. काही प्रजाती या निमविषारी गटात मोडतात जसे की हरणटोळ, मांजऱ्या, उडता सोनसर्प, इ. यांच्या विषाचा मानवावर विशेष परिणाम होत नाही. हे सोडून बाकीचे सगळे साप हे बिनविषारी आहेत. यांमध्ये प्रामुख्याने धामण, अजगर, नाणेटी, पाणदिवड, तस्कर, धुळनागिन, गवत्या, कवड्या, कुकरी, इ. प्रजाती आढळतात.

साप हे शीतरक्ताचे प्राणी असून त्यांना फारच कमी अन्नाची गरज पडते. एकदा पोटभर खाल्ले की कित्तेक दिवस विना अन्नाचे ते राहू शकतात. (त्यांच्या शरीराचे तापमान आजूबाजूच्या वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांची कमी ऊर्जा खर्च होते. उलट आपण उष्ण रक्ताचे प्राणी असल्याने आपल्याला खाल्लेले अन्नापासून ऊर्जा मिळून त्यावर आपले शारीरिक तापमान नियंत्रित केले जात असल्याने जास्त ऊर्जा खर्च होते.) उंदीर, पाली, बेडूक, कीटक, पक्षी हे त्यांचे खाद्य आहे. मण्यार, नागराज हे इतर सापांना खाऊन टाकतात.

तरी या सापांचे आपल्याला फायदे कोणते?
१) नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये साप भक्ष्य आणि भक्षक म्हणून अनन्य साधारण महत्त्वाचा घटक आहेत. आपला आजूबाजूला वाढवणारा तसेच त्रासदायक अशा उंदरांच्या आणि कीटकांच्या संख्येवरती ते नियंत्रण ठेवायचे खूप महत्त्वाचे काम करतात. सोबत शिकारी पक्षी, घोरपड, कोल्हा हे सापांना मारून खातात म्हणून ते त्यांचे अन्न म्हणून काम करतात. २) विषारी सर्पदंश झाल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एकमेव औषध असलेले जे प्रतिविष वापरले जाते ते निर्माण करण्यासाठी सुद्धा याच विषारी सापांच्या विषाचा उपयोग केला जातो. ३) वैद्यकीय क्षेत्रात मेंदूचे कित्येक आजार जसे पार्किन्सन, फिट येणे, पक्षाघात आणि हृदयाशी निगडित विकारांमध्ये या सर्प विषापासून वेगवेगळे प्रथिने वेगळी करून त्यांचा औषध म्हणून वापर केला जातो.

आता साप आणि मानव यांचा संघर्ष का होतो आणि साप समोर आल्यानंतर काय करावे, साप चावल्यानंतर काय करावे हे आपण पाहूया…

वाढती मानवाची लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होणारी प्रचंड जंगलतोड, वाढत्या वस्त्या, शेतामध्ये वाढता कीटकनाशकांचा वापर त्यामुळे निसर्गाची अपरिमीत  झाल्याने अधिवास नष्ट होऊन आणि भक्ष कमी झाल्याने नवीन निवारा आणि भक्ष्याच्या शोधात नाईलाजाने साप मानवी वस्तीकडे येतात. आपल्या वस्तीच्या आजूबाजूला दाट झाडी, घाण, उघड्यावर टाकलेला कचरा, तुंबलेल्या गटारी  हे सापांना आकर्षित करतात. साप दिसल्यानंतर सर्वप्रथम घाबरून न जाता व त्याला न मारता त्या सापाला निघून जायला मोकळा मार्ग देणे हे कधीही चांगले. साप घरात आल्यास त्याच्यावरती विजेरीने दुरून लक्ष ठेवून जवळच्या एखाद्या प्रामाणिक प्राणीमित्राला बोलवून त्या सापाला सुरक्षितपणे पकडून लगेचच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हे योग्य. अशा वेळेला गडबड, गोंधळ, गोंगाट,धावपळ करू नये. त्या सापाला कोणत्याही प्रकारे डीवचू नये. ते माणसाला जास्त घाबरतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सदैव लपून बसतात किंवा पळून जायचा प्रयत्न करतात, अडचणीत आल्यासच अगदी शेवटी ते चावा घेतात. त्यामुळे आपण घाबरून जायची अजिबात गरज नाही.
सर्पदंश होऊ नये म्हणून दाट झाडी, गवत यामधून जाताना पायामध्ये उंच आणि चांगले बूट असावेत पूर्ण बाह्याचे कपडे, डोक्यावर टोपी असावी, अंधारामध्ये चालताना हातामध्ये विजेरी किंवा मोबाईलचा टॉर्च लावूनच प्रवास करावा. शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करताना या गोष्टींचा आवर्जून वापर करावा. शेतात काम करताना, किंवा अडचणीतून काही काढताना डायरेक्ट हात न घालता आधी थांबावे, काठीने तिथे हालचाल करावी, आवाज करावा. अश्या ठिकाणी लपलेले साप घाबरून निघून जातील/ आवाज करून आपल्याला इशारा देऊन सावध करून दंश होण्यापासून वाचू. घरामध्ये साप येऊ नयेत म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून उंदीर होणार नाहीत. गटारी नाले झाकलेले वाहते ठेवावेत, घराच्या भिंती आणि खिडक्या यांच्या आजूबाजूला झाडांची योग्य प्रकारे छाटणी करावी. रात्री साप जमिनीवर फिरत असल्याने आणि अंथरुणात आल्यास बऱ्याचदा दंश होतो त्यामुळे जमिनीवर झोपणे टाळून त्याऐवजी खाट, चारपाई यावर झोपावे. मच्छरदानी चा वापर करावा. सरपण, जनावरांचा चारा उंचावर आणि घर गोठ्यापासून दूर साठवावा.

एवढे करूनही सर्पदंश झालाच, तर मुळीच घाबरून न जाता त्वरित 108 नंबरला फोन करून ॲम्बुलन्स बोलवावी. मदतीला इतर लोकांना बोलवावे. रुग्ण घाबरलेला असल्याने त्याची हृदयाची गती वाढून विष शरीरात लवकर भिनू नये म्हणून त्या व्यक्तीला धीर द्यायचा आणि शांत ठेवायचे. बिनविषारी साप चावल्यावर सुद्धा फक्त भीतीने माणूस बेशुद्ध होतो किंवा मृत्यू झाल्याचे दिसून येते. दंश झालेला भाग हृदयाच्या रेषेपासून खाली ठेवावा. दंश झालेल्या जागी अजिबात धारदार वस्तूंनी चीरे पाडू नये. त्यामुळे अति जास्त रक्तस्त्राव होऊन शकतो. तोंडाने विष चोखून काढत बसू नये. तसे केल्याने विष निघत नाही, उलट तोंडात जखम असेल तर चोखणाऱ्यालाच विषबाधा होईल. माहित असल्यासच आवळपट्टीने/ कापडाने जखम बांधावी पण करकचून बांधू नये. या ठिकाणचा रक्तप्रवाह आपल्याला संथ करायचा असतो. करकचून बांधल्यास रक्तप्रवाह बंद झाल्यास हातपाय तोडायची वेळ येते. मिळेल त्या वाहनाने अजिबात वेळ न दवडता सदर रुग्णाला शक्य तितके लवकर जवळच्या मोठ्या दवाखान्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणी सरकारी इस्पितळात घेऊन जायचे. साप मारून न्यायची अजिबात गरज नाही. कृपया बुवाबाजी, मंत्र-तंत्र जडीबुटी यांच्या नादाला लागू नये. त्यामध्ये अमूल्य वेळ वाया जाऊन रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते.

मित्रहो, निसर्गाने आपल्यासारखेच सापांना सुद्धा जगण्याचा तेवढाच अधिकार दिलेला आहे. फक्त जास्त बुद्धी असल्याने आपली नैतिक जबाबदारी पडते की आपण थोडसं काळजीपूर्वक आणि सावधानतेने वागायचं आणि त्यांना देखील सुखाने जगण्याला वाव द्यावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort