‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२३’ मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर
महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातून १७०० किलोमीटर वारीचा प्रवास राहणार असून, समता विचार सांगणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
पुणे (बारामती झटका)
‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२३’ वर्षीच्या मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी मोरे महाराज हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त, संत तुकाराम महाराज देवस्थान देहू संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत. वृक्षदाई संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखत भंडारा, भामचंद्र सह देहुगाव परीसरात वृक्ष संवर्धन कार्यास मोठी गती दिली आहे. मराठवाड्यात वृक्ष संवर्धन कार्य वाढायला हवे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार समिती’ चे ते विश्वस्त आहेत.


संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन आयोजित समता वारीचे हे पाचवे वर्षे असुन, रविवार दि. १ जानेवारी २०२३ श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून बुधवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय जन्मभूमी देहुगाव येथे समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नाशिक, नगर, पुणे या ९ जिल्ह्यातुन १७०० किलोमीटर प्रवास करणार आहे. समाजातील वाढत जाणारी दरी, विषमता, जातीयता, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयांवर जागृती करण्यात येणार आहे. वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. माणसा-माणसातील वाढत चाललेली दरी कमी होउन समाजात बंधुभाव वाढीस लागावा यासाठी व समता, मानवता व बंधुभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचण्यासाठी ही वारी निघत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
