Uncategorizedताज्या बातम्या

उष्णतेच्या धगीने पशुपक्षीही होत आहेत घायाळ

शीतपेयांना पसंती, ए.सी., कुलरचा जास्त वापर

नातेपुते (बारामती झटका)

दिवसेंदिवस वातावरणातील उष्णतेची धग वाढू लागली आहे. सूर्यनारायण आग ओखत असून नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे येणारा थकवा व शरीराचा क्षीण कमी होण्यासाठी शीतपेयांसह इतर थंडावा मिळणाऱ्या पेयास मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. तर अंगाला थंडावा मिळावा म्हणून ए.सी., कुलरचा जास्त वापर होताना दिसत आहे. माणसांप्रमाणेच पशुपक्षी देखील तीव्र उन्हामुळे घायाळ होत असून सावलीचा सहारा घेताना दिसत आहेत.

मे महिना सुरू असून कडक ऊन व अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील कमालीच्या बदलामुळे उन्हाचा उकाडा वाढल्याने सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाची झळ सोसावी लागत आहे. उन्हात सकाळी गेल्यावरही घामाच्या धारा अंगातून वाहताना दिसत आहेत. परिणामी शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी नागरिक शीतपेयांसह नारळ पाणी, कलिंगड यांच्यासह बाजारात हात गाडीवर मिळणाऱ्या तयार लिंबू सरबत, कोकम सरबत, अननस व संत्री तसेच मोसंबी सरबत, लस्सी, आईस्क्रीम, दही, ताक याला अधिक पसंती देत आहेत.

दुपारी अंगाची लाही नाही होत असून दिवसभराच्या तापमानामुळे सायंकाळीही गरमाई जाणवत आहे. पंख्याची हवा सुद्धा गरमच लागत असून कुलरचा व ए.सी. चा वापर सर्वात आहे. त्यातच विजेचा लपंडाव सतत सुरू असून उष्णतेमुळे जीवाची घालमेल होत आहे. पूर्वी पंख्याच्या हवेवर थंडावा मिळायचा पण आता तापमान वाढत असल्याने छोट्या-मोठ्या कुलरचा वापर घरोघरी होताना दिसत आहे. प्रवास करतानाही अतिशय तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून जीवाला थंडावा देण्यासाठी आता रस्त्यावर उसाचा रस, शीतपेय यांच्यासह थंडावा देणारी छोटी मोठी विविध पेयाची दुकाने थाटली आहेत.

उन्हाच्या तीव्रतेने पशु, पक्षी, जनावरे अर्धमेली झाली आहेत. माणसाप्रमाणे पशुपक्षी तीव्र उन्हामुळे घायाळ होत असून उन्हात सावलीचा सहारा घेताना दिसत आहेत. यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाच्या झळया लागत आहेत. सायंकाळी सात पर्यंत ऊन जाणवत आहे. शिवारातील पाणी आटत आहे. हा त्रास पशु, पक्षी, जंगली व पाळीव जनावरांना सहन करावा लागत आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसत असून दुधाचे प्रमाण कमी होत आहे. संकरित गाईंना उन्हाचा त्रास होत आहे. उन्हामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्यासाठी खर्च करावा लागत आहे. दुधाळ जनावरांची वासरे, कालवडी, रेडकू हे उन्हामुळे कासावीस होत आहेत. सध्या शेतीची मशागत सुरू असून उन्हामुळे हे काम सकाळी किंवा सायंकाळी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत‌.

जनावरांची काळजी आवश्यक
उन्हामुळे जनावरे दुधाला कमी येतात‌. त्यांच्यामध्ये धापाची क्षमता वाढते. उष्माघातामुळे जनावरे दगावू शकतात. गाभण गाईचा गाभ पडू शकतो. आजारी पडतात. तापमान राहिले की त्याचे रूपांतर गोचीड तापात होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button