मांडवे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भूमिपुत्र आग्रही असल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढणार
मांडवे (बारामती झटका)
महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 11 गट व पंचायत समितीचे 22 गण नव्याने फेरबदल करून तयार केलेले होते. त्यामध्ये मांडवे जिल्हा परिषद गटात मांडवे, सदाशिवनगर, पुरंदावडे, जाधववाडी, येळीव, मेडद, भांबुर्डी, गोरडवाडी, जळभावी, तरंगफळ असा जिल्हा परिषद गट तयार झालेला होता. मांडवे पंचायत समिती गणात मांडवे, सदाशिवनगर व पुरंदावडे या गावांचा पंचायत समिती गट तयार झालेला होता. मांडवे जिल्हा परिषद व पंचायत समिती गण तयार झालेला असल्याने भूमिपुत्र गावातीलच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतलेली असल्याने अनेक इच्छुक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची डोकेदुखी ठरणार आहे.
मांडवे गाव माळशिरस तालुक्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. या गावाला नैसर्गिक वारसा लाभलेला असल्याने गावाची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर गाव आहे. सदरच्या गावामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते कार्यरत आहेत. मांडवे गावच्या भूमिपुत्रांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य पदाच्या माध्यमातून गावाचा व परिसराचा विकास केलेला आहे. गावामध्ये अनेक तरुण होतकरू, उद्योगी व राजकारणात अग्रेसर आहेत. सर्व तरुणांनी मनाशी खुणगाठ बांधलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हा मांडवे गावचा भूमिपुत्र झाला पाहिजे. गावच्या सदस्यासाठी कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या गटाचा हे न पाहता भूमिपुत्र म्हणून सर्वांनी सहकार्य करायचे, असा तरुणाईचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. मांडवे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील व गटाच्या बाहेरील अनेकजण इच्छुक आहेत. नेतेमंडळींचे सामाजिक कार्य, लग्न, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे सुरू आहे. भूमिपुत्रांनी अशी भूमिका घेतलेली असल्याने जिल्हा परिषद गटातील व गटाबाहेरील इच्छुकांची डोकेदुखी ठरणार आहे. सध्या गण व गट रचना बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेकजण दबा धरून बसलेले आहेत. उभा राहणार अशी इच्छा मनात आहे परंतु, अजून प्रकट केलेली नाही, असेही काही नेते मंडळी आहेत. मात्र, जनसंपर्कात असलेल्या इच्छुकांची मात्र डोकेदुखी वाढलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng