राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर एकत्रित सुनावणी
सरन्यायाधीशांचे खंडपीठ १३ ऑक्टोबरला सुनावणी करणार
दिल्ली (बारामती झटका)
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांविरोधात दाखल अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या शरदचंद्रजी पवार गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार आहे. याच दिवशी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या प्रलंबित याचिकेवर देखील सुनावणी होणार आहे. आपल्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी शरदचंद्रजी पवार गटाने केली होती; परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते जयंत पाटील यांच्यावतीने वरिष्ठ अधिवक्ते कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला. अजितदादा पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर एक याचिका दाखल करण्यात आली होती; परंतु त्यांनी अद्याप यावर काहीच कारवाई केली नाही, असे सिब्बल म्हणाले. अजितदादा पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अपात्रतेसंदर्भात एक याचिका सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आली होती आणि त्यावर नोटीस जारी करण्यात आल्याचे सांगितले. यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १३ ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल उद्धव ठाकरे गटाच्या एका प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल याचिकेवर सुनावणीस दिरंगाई करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील अध्यक्षांकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर काहीही करण्यात आले नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने गत सुनावणीत नोंदवले होते. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी अनिश्चितकाळ विलंब करू शकत नाही. अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा सन्मान करावा लागेल आणि त्याच्या आदेशाचे पालन करावे लागेल, असे खंडपीठ म्हणाले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The way you explained the topic is impressive. For further details, I recommend this link: EXPLORE FURTHER. What do you all think?