कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

जिल्हाधिकारी यांच्या लंम्पी प्रादुर्भावाच्या आड कोणता पुढारी लपलेला आहे ?, उलट सुलट चर्चा…

श्री गणेश उत्सवानिमित्त तुकाराम भाऊ देशमुख व सचिन आप्पा वावरे मित्र परिवारांच्यावतीने अचानक बैलगाडी शर्यत रद्द का झाली ?, संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे…

माळशिरस ( बारामती झटका)

माळशिरस येथील गारवाड पाटी या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार दि. 8 ऑक्टोंबर 2023 रोजी केलेले होते. सदर बैलगाडी शर्यतीचे आयोजन श्री गणेश उत्सवानिमित्त माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख व माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक उद्योजक सचिन आप्पा वावरे मित्र परिवारांच्या वतीने करण्यात आलेले होते. सदरच्या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक बुलेटसह पाच गाड्यांचे बक्षीस होते. सर्व नियम व अटी पूर्ण करून परवानगी असलेले मैदान अचानक जिल्हाधिकारी यांनी लंम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे कारण देत रद्द करण्याचे आदेश दिलेले असल्याने सदरचे मैदान रद्द झालेले आहे. जिल्हाधिकारी यांच्या लंम्पी प्रादुर्भावाच्या आड कोणता पुढारी लपलेला आहे, याची उलटसुलट चर्चा बैलगाडी चालक-मालक व माळशिरस पंचक्रोशीमध्ये दिवसभर रंगलेली आहे.

बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी सर्व विभागाचे पत्रव्यवहार करून घेतलेली होती. विशेष म्हणजे पशुसंवर्धन अधिकारी यांची सुद्धा परवानगी होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या लंम्पीचा म्हणावा असा प्रादुर्भाव नाही. अनेक ठिकाणी आठवडा जनावरांचे बाजार सुरू आहेत. प्रशासनाने परवानगी सुरुवातीलाच द्यायला नको होती. दिल्यानंतर बैलगाडी शर्यत होऊन द्यायला पाहिजे होती. कारण, लाखो रुपये किमतीचे बैलांना लसीकरण केलेले असते. बैलगाडी शर्यतीसाठी बक्षिसांची खैरात असल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, मराठवाडा, विदर्भ अशा अनेक भागातील बैलगाडी चालक-मालक आदल्या दिवशी माळशिरस परिसरात नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे मुक्कामी आलेले होते. बैलगाडी शर्यतीचे नियोजन नेटके केलेले होते. भव्य व्यासपीठ, प्रेक्षकांना गॅलरी उभा केलेली होती. असे असताना अचानक प्रशासनाकडून सायंकाळी सहा वाजता आदेश निघाला. सदरची बैलगाडी शर्यत घेता येणार नाही. त्यामुळे बैलगाडी चालक-मालक व शौकीन यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. बैलगाडी शर्यतीने आपल्याला कोणी राजकीय शर्यतीत स्पर्धक होऊ नये, अशीही शंकाकुशंका दिवसभरात नागरिकांमधून चौकाचौकात ऐकावयास मिळत आहेत.

बैलगाडी शर्यतीचे नेटके नियोजन केलेले होते. शासनाच्या सर्व परवानगी घेतलेल्या होत्या तरीसुद्धा, प्रशासनाकडून बैलगाडी शर्यत रद्द झाली. संपूर्ण तयारी केलेली वाया गेली. बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांच्यामध्येही नाराजी पसरलेली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून बैलगाडी शर्यत रद्द केलेली आहे. भविष्यात पुन्हा बैलगाडी शर्यत घेतली जाणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button