ताज्या बातम्यासामाजिक

स्त्री भ्रूण हत्येचे रॅकेट कसे चालते, ट्रेलर हाती आला, पिक्चर अजून बाकी आहे.

माळशिरस (बारामती झटका)

आधुनिक युगात माणसं चंद्रावर गेली तरीसुद्धा पुरुषप्रधान संस्कृती सोडण्यास तयार नाहीत. आजही मुलगा आणि मुलगी भेदभाव मानला जातो. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्याचे पातक सुरूच आहे. खऱ्या अर्थाने समाजामधील काही मंडळी व डॉक्टर्स यांच्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे रॅकेट कसे चालते, याचा ट्रेलर हाती आलेला आहे पण, पिक्चर अजून बाकी आहे.

शासन स्त्रीभ्रूण हत्येविषयी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करीत असते. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे कायदा दुबळा केला जातो. त्यामुळे वाममार्गाने डॉक्टर माया जमा करीत असतात. काही डॉक्टरांनी स्त्रीभ्रूण हत्येसाठीच दवाखाने सुरू केले आहेत‌. कितीतरी ठिकाणी दवाखान्याचे बोर्ड लावलेले डॉक्टर आणि प्रत्यक्ष दवाखान्यात ऑपरेशन करणारे डॉक्टर वेगळे असतात.

डॉक्टर स्त्रीभ्रूण हत्या घडवीत असताना मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या साह्याने सावज शोधली जाते .काही वेळेला गॅरेज, दुकान यामध्ये व्यवहार ठरविला जातो. रस्त्याच्या आडबाजूला किंवा वनीकरणाच्या निर्जन ठिकाणी तपासणी केली जाते. मात्र, चेक करण्याकरता मशीन घेऊन जाणारी व्हॅन गाडी आसपासची लोक उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. मात्र, स्थानिक पोलीसांना ठावठिकाणा कसा लागत नाही याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला असतो.

चेकअप केल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. माहेरची किंवा सासरच्या मंडळीकडील ओळखीची महिला सोबत आणली जाते आणि स्त्रीभ्रूण हत्या करण्यात येते. आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते‌. काही डॉक्टरांनी खाजगी एजंट पंटर यांच्या माध्यमातून आसपासच्या तालुक्यातील ओळखीने, नातेवाईक यांच्या साह्याने अनेक स्त्रीभ्रूणहत्येचे सावज गळाला लावले जाते. कधीतरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासामध्ये विविध ठिकाणच्या डॉक्टरांची नावे उघड होऊन तपासाकरिता घेऊन जातात किंवा डॉक्टर आर्थिक हितसंबंधांमुळे पसार केले जातात, याची माहिती स्थानिक नागरिक यांच्याकडून चर्चेतून मिळत आहे.

पोलिसांनी अटक केली तर कसे सुटतात व अटक करण्याकरता आले तर डॉक्टर कसे निसटून जातात ?, स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट कसे चालते ?, ट्रेलर हाती आलेला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button