पोलीस आणि पत्रकार यांचा समन्वयाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहते – नूतन पोलीस निरीक्षक नारायण पवार.

माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे यांच्या बदलीनंतर पदस्थानी नूतन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पदभार स्वीकारला….
माळशिरस (बारामती झटका)
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असते. पोलीस प्रशासनाला पत्रकार बांधव यांचेही सहकार्य मोलाचे असते. अनेकवेळा बातम्यांमधून गुन्हेगारी व चोरी यांना आळा बसतो. तपासकामी सुद्धा पत्रकारांचा उपयोग होतो. यासाठी पोलीस आणि पत्रकार यांचा समन्वय कायदा व सुव्यवस्थेसाठी फायद्याचे राहते, असे मत माळशिरस पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पत्रकारांशी ओळख व चहापान कार्यक्रमात बोलताना सांगितले.
माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे बदली झालेली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदी पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी सुसंवाद साधण्यासाठी पोलीस स्टेशन येथे सुसंवाद बैठक संपन्न झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते, ज्येष्ठ पत्रकार अशोक सिदवाडकर, अनंत दोशी, एल. डी. वाघमोडे, तानाजी वाघमोडे, सौ. शोभा वाघमोडे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

श्री. नारायण पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून पोलीस उपनिरीक्षक पदावर पोलीस प्रशासनात नोकरीस सुरुवात केली. गडचिरोली, मुंबई, सातारा, पुणे अशा जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशन येथे काम केले आहे. पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक अशी बढती मिळत गेलेली आहे. श्री नारायण पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठीकठिकाणी पोलीस प्रशासनाचा पदभार घेतल्यानंतर त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाचे अनेक गुणगौरवांचे पुरस्कार मिळालेले आहेत. यात पत्रकारांचे विशेष सहकार्य लाभल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
दैनिक लोकमतचे पत्रकार एल. डी. वाघमोडे यांनी बोलताना सांगितले की, आपण माळशिरस पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्याबद्दल पत्रकारांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा. आपण पदभार घेत असतानाच आम्हाला बोलावलं त्यामुळे आपण सुरुवात चांगली केलेली आहे. निश्चितपणे पत्रकारांची सकारात्मक व जनहिताची पत्रकारिता यासाठी पत्रकार कटिबद्ध राहतील. भविष्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तत्पर राहतील असा विश्वास व्यक्त केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.