ताज्या बातम्याराजकारण

सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात सुनेत्राताई पवार की आणखी कोण ?

बारामतीमध्ये आतापर्यंत एकहाती सत्ता असलेल्या पवार कुटुंबात अजितदादा पवारांच्या बंडामुळे फुट पडली. सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात जर सुनेत्राताई पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्या तर मात्र सुळेंना ही निवडणूक जड जाणार असल्याचं दिसतंय. 

बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती. गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण. 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधी यांना पराभूत करून भाजपने काँगेसचा गड खालसा केला. अमेठी हा काँगेसचा गड खालसा केल्यानंतर भाजपने आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती असे म्हणत भाजपने सुप्रियाताई सुळे यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांनी येऊन ठेपल्या असून भाजपने राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाडण्याचा चंग बांधला आहे. अजितदादा पवारांचे भाजपसोबत जाणे हे सुप्रियाताई सुळे यांना धोका निर्माण करणारे आहे का ?

बारामतीतून 1957 साली काँगेसचे केशवराव जेधे हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. तेव्हापासून 1977 चा अपवाद वगळता कायमच ही जागा काँग्रेस आघाडीकडे राहिली आहे. गेली तीन टर्म खासदार सुप्रियाताई सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पण सुप्रियाताई सुळे यांना यंदा पराभूत करायचाच, असा चंग भाजपने बांधला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा त्यात समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे दोन, संजय जगताप आणि संग्राम थोपटे आणि भाजपचे दोन, राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत.

गेली अनेक वर्षे बारामती लोकसभा मतदारसंघावर पवारांचे वर्चस्व प्रस्थापित आहे. 1984 साली शरदचंद्रजी पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर कायमच ही सीट आघाडीकडे राहिली. 1989 ते 91 मध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील (हर्षवर्धन पाटील यांचे चुलते) निवडून आले. त्यानंतर 1991 साली अजितदादा पवारांना खासदारकीची संधी मिळाली. पण राजकीय परिस्थितीत अजितदादा पवारांना राजीनामा द्यावा लागला आणि शरदचंद्रजी पवारांनी 2009 पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. सन 2009 साली सुप्रियाताई सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरदचंद्रजी पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले.

गेली अनेक वर्षे ही जागा पवारांकडे असल्याने पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगली बांधणी केली. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरते ते म्हणजे सहकार. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना प्रतिनिधित्व देऊन पवारांनी अनेकांना संधी दिली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना सहकाराचे जाळे देखील बघावे लागते. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सुप्रियाताई सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. सुप्रियाताई सुळे यांनी 2009 मध्ये भाजपच्या कांता नलावडे यांचा,  2014 मध्ये महादेव जानकर यांचा तर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. 

सुप्रियाताई सुळे- 4,87,827 मते (विजयी)

कांता नलावडे- 1,50,996 मते (पराभूत)

मताधिक्य – 2 लाख 46 हजार

2014 साली महादेव जानकर हे सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता.

2019 मध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

2021 साली भाजपने मिशन बारामती आखले आणि बारामती जिंकण्यासाठी मोट बांधायला सुरुवात केली. 2022 आणि 2023 मध्ये भाजपच्या अनेक जेष्ठ नेत्यांचे दौरे झाले. त्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हादसिंह पटेल तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांचे अनेक दौरे बारामती लोकसभा मतदारसंघात झाले. काहीही जरी झाले तरी 2024 मध्ये बारामतीत कमळ फुलवणार असा चंग बांधला आहे.

याआधी कोणतीही निवडणूक होण्याआधी भाजपने कधीही बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची इतकी तयारी केली नव्हती एवढी 2024 साली केली आहे. दर तीन किंवा चार महिन्यातून भाजपच्या एका नेत्यांचे दौरे होत आहेत. या दौऱ्यामधून कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहे. 

अजितदादा पवारांनी 2 जुलै रोजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची गणितं बिघडली. अजितदादा पवार सत्तेत स्थापन झाल्यानंतर अजितदादा पवार हट्टाने पुण्याचे पालकमंत्री झाले. त्यांनतर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात भाजप बॅकफुटवर जाऊन अजितदादा पवार फ्रंटफुटवर आले आणि अजितदादा पवारांचे पुन्हा एकदा मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले.

कर्जत येथील मेळाव्यात अजितदादा पवारांनी बारामतीसह अन्य काही जागा लढणार असल्याचे सांगितले आणि चर्चा सुरू झाली, सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची. सुप्रियाताई सुळे यांना पडण्यासाठी पवारांच्या घरातीलच उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा आहे. लोकसभेसाठी अजितदादा पवारांच्या पत्नी सौ. सुनेत्राताई पवार यांच्या नावाची चर्चा आहे. याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी सुनेत्राताई पवारच उभा राहतील अशी चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी अजितदादा पवारांनी रायगड, सातारा, बारामती आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुनेत्राताई पवारांना संधी द्यावी का यावर भाजपमध्ये दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. त्यातील एक गट हा कमळाच्या चिन्हावर लढायला प्राधान्य देतो तर दुसरा गट अजितदादा पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवारांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभा करावे अशी मागणी त्यांच्या पक्षाकडे केली असल्याचे खाजगीत सांगतात.  सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची राष्ट्रवादीने आधीच घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

– सुनेत्राताई पवार, रुपाली चाकणकर, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, कांचन कुल.

– भाजपने अजितदादा पवारांवर दबाव टाकला तर सुनेत्राताई पवार याच उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर-हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार, स्वतः अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे हे एकाच गटात आहेत.

काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांना निवडून आणण्यात अजितदादा पवारांचा मोठा वाटा आहे. कारण संजय जगताप यांच्या विरोधात विजय शिवतारे यांना अजितदादा पवारांनी सांगून पाडले होते. पण आगामी काळात संजय जगताप आघाडी धर्म निभावत सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार करतात का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. काँग्रेसचे दुसरे आमदार संग्राम थोपटे आणि शरदचंद्रजी पवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे संग्राम थोपटे हे सुप्रियाताई सुळे यांचे काम करतील अशी शक्यता फार कमी आहे.

भाजपचे दोन आमदार राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे महायुती सोबत असतील.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे अजितदादा पवारांसोबत गेल्याने शरदचंद्रजी पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादा पवारांसोबत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. दोन दशकांपासून राज्याचा कारभार शरदचंद्रजी पवारांनी अजितदादा पवारांच्या हातात सोपवला आणि ते केंद्रात रमले. त्यामुळे अजितदादा पवारांच्या बंडानंतर अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादा पवारांसोबत असण्याचे पाहायला मिळतात. सहकारी कारखाने असतील किंवा पुणे जिल्हा बँक असेल यावर अजितदादा पवारांचे वर्चस्व आहे. फक्त पुरंदरमधील काही पदाधिकारी वगळले तर संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवारांसोबत राहिली आहे.

2019 साली इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार केला होता. आता हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये तर दत्तात्रय भरणे अजितदादा पवार गटात आहेत

2019 ला दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात आणि वैशाली नागवडे यांनी सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार केला होता. आता ते दोघेही अजितदादा पवार गटात आहेत. भाजप आमदार राहुल कुल यांची ताकद दौंडमध्ये अधिक वाढली आहे. 

2019 ला बारामतीत संपूर्ण राष्ट्रवादी ही सुप्रियाताई सुळे यांच्या ताकदीने उभी राहिली होती. 2024 अजितदादा पवारांच्या बंडानंतर अजितदादा पवारांच्या मागे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत.

2024 ला पुरंदर तालुक्यातील काही पदाधिकारी सोडले तर सगळे सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत आहेत. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांचा सुप्रियाताई सुळे यांना विरोध होऊ शकतो.

अजितदादा पवारांच्या बंडाआधी भाजपचे, महायुतीचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यामध्ये निर्मला सीतारामन, प्रल्हादसिंह पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, विजय शिवतारे, महादेव जानकर यांचे मोठ्या प्रमाणात दौरे होत होते. चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने बैठका घेत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं होतं. कधी नव्हे ते भाजपने इतक्या मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलं होतं. 

ज्यावेळेस मोठ्या नेत्यांचे दौरे व्हायचे त्यावेळेस कार्यकर्त्यांना दिवाळी असल्यासारखं वाटायचं. सुप्रियाताई सुळे पडणार की काय अशी चर्चा देखील रंगू लागली होती. परंतु अजितदादा पवार भाजपसोबत सत्तेत गेले आणि भाजपचं मिशन बारामती थांबलं. ज्येष्ठ नेत्यांचे दौरे देखील थांबले. त्यामुळे जरी भाजप सातत्याने सांगत असलं की आम्ही 51 टक्के मते घेऊन जिंकून येऊ, तशी परिस्थिती अजितदादा पवारांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात राहिलेली नाही.

भाजपचे जेष्ठ नेते बारामतीत यायचे, अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करायचे. नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवरती आला होता. शेतकऱ्यांना प्रदूषण थांबेल असे वाटले. पण अजितदादा पवार सत्तेत आले आणि कारवाई थांबली. अजितदादा पवारांच्या बंडानंतर मिशन बारामतीच्या चर्चा थांबल्या. भाजपच्या जेष्ठ नेत्यांचे दौरे थांबले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहानभूतीही खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने आहे.

अजितदादा पवारांच्या बंडानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यापुढे येऊन भाजपच्या विरोधात लढत राहिल्यात. बारामती लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यात देखील आजूबाजूचे सगळे पदाधिकारी लांब गेल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे या ताकदीने फुटून गेलेल्या गटाच्या विरोधात न लढता त्या भाजपावर सातत्याने टीका केल्याचं दिसून आलं. मतदारसंघात सातत्याने दौरा करणे, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणं, तात्काळ तोडगा काढणं आणि पक्षाला मजबूत करणं हे खासदार सुप्रियाताई सुळे करताना पाहायला मिळत आहेत.

सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उमेदवार हा जर पवार कुटुंबातील दिला तर सुप्रियाताई सुळे यांना ही निवडणूक कठीण जाऊ शकते. पण जर उमेदवार हा पवार कुटुंबाच्या बाहेरचा दिला तर मात्र सुप्रियाताई सुळे या विजयी होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. अजितदादा पवारांवर भाजपने जर दबाव टाकला तर अजितदादा पवार पत्नी सुनेत्राताई पवारांना उमेदवारी देऊ शकता, अशी सूत्रांची माहिती आहे. 

अजितदादा पवारांनी बंड केले, पंरतु बारामतीत लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. लोकसभेत सुप्रियाताई सुळे आणि विधानसभेला अजितदादा पवारांना मदत करायची, अशी कार्यकर्त्यांची सवय आहे. पण अजितदादा पवार कोणाला उमेदवारी देतात यावर खूप काही अवलंबून आहे.

अजितदादा पवार बारामतीत अधिकचे लक्ष घालून आहेत. अनेक कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून केला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर अनेक मातब्बर नेत्यांच्या समोर सुप्रियाताई सुळे यांना आपला टिकाव धरायचा आहे. वरवर बघायला गेलं तर मोठी ताकद महायुतीच्या बाजूने आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 51 टक्के मतदान घेऊन महायुतीचा उमेदवार जिंकून येईल असं सातत्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगत आहेत. 

अजितदादा पवारांनी देखील बारामतीत जिंकणार असल्याचं सांगितला आहे. शरदचंद्रजी पवारांना सोडून अजितदादा पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाणं हे बारामतीकरांना रुचले आहे का ? अजितदादा पवार सातत्याने शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करू लागलेत, हे बारामतीकरांना आवडले आहे का ? काटेवाडीतील लोक कधी अजितदादा पवारांच्या विरोधात बोलले नाहीत, परंतु अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चात मात्र अजितदादा पवारांवर काटेवाडीकरांनी निशाणा साधला होता. त्यामुळे जरी मोठ्या संख्येने पदाधिकारी अजितदादा पवारांसोबत असले तरी सर्वसामान्य जनता कुणाच्या बाजूने आहे, हे 2024 च्या निकालातून स्पष्ट होईल. आता नेमकं तिकीट कुणाला मिळतं याच्यावर सुप्रियाताई सुळे यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पण सर्वसामान्य लोकं कुणाला पसंती देतात हा येणारा काळच ठरवेल.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort