पिलीव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस पालखी सोहळ्याने भक्तिमय वातावरणात प्रारंभ

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवी या ठिकाणी माघ पौर्णिमेपासून ते महाशिवरात्री पर्यंत फार प्राचीन काळापासून भव्य व दिव्य स्वरूपात भक्ती भावाने यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते. या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यातील भाविकभक्त त्याचप्रमाणे व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. या यात्रेमध्ये शेळ्या, मेंढ्या त्याचप्रमाणे गाय, बैल, म्हैस यांचीही खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्याचबरोबर या यात्रेमध्ये कुस्त्यांचा जंगी फड, देवीची रथातून भव्य मिरवणूक, शेतीमालाचे भव्य प्रदर्शन, बैलगाडा रेस तसेच खिलार जनावरांच्या निवडी व सर्व धार्मिक विधीयुक्त असे मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होत असतात.
ही यात्रा प्राचीन काळापासून असल्यामुळे या यात्रेला कोणत्याही प्रकारचे आमंत्रण निमंत्रण याची वाट न पाहता भाविकभक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. या ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर, श्रीनाथ मंदिर, श्री म्हसोबा मंदिर या ठिकाणी जे ते पुजारी अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतात. या यात्रेमध्ये मोठमोठाले हॉटेल्स मिठाईची दुकाने सिनेमाचे तंबू, लोकनाट्य (तमाशा), उंच पाळणे, झोके, लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने, सौंदर्यप्रसाधनाची दुकाने त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात. यात्रा कमिटी व मार्केट कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी देखभाल केली जाते. याठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत असते. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सद्गुरु श्री श्री साखर कारखाना यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी यात्रा कमिटीच्या नियंत्रणाखाली सर्व प्रकारे सोयी सुविधा पुरविल्या जाऊन भाविकभक्तांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले जाते.
अशा यात्रेला महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातून व सासुरवाशीन, माहेरवाशीन तसेच उद्योग व्यवसायासाठी व नोकरीसाठी देश स्थानिक बाहेरगावी असतात ते सर्वजण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. या यात्रेची सुरुवात मेटकरी वाड्यातून श्री महालक्ष्मी देवीची पालखी सजवून श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती त्या पालखीमध्ये ठेवून विविध वाद्यांच्या गजरात व “श्री महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं”, “आई राजा उदो उदो” या जयघोषामध्ये असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गावच्या मुख्य पेठेतून व पायघड्या घालत, तोफा व फटाक्याच्या आतषबाजीत रीतीरीवाजाप्रमाणे पालखीचे प्रस्थान श्री महालक्ष्मी मंदिराकडे यात्रेच्या ठिकाणी झाले. सदर पालखी सोहळ्याचे दर्शन व स्वागत करण्यासाठी भाविकांची बहु गर्दी झाली होती. या यात्रेमुळे पिलीव व पिलीव परिसरात मोठ्या प्रमाणात धार्मिक व आनंदाचे वातावरण दिसत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.