भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हातात तलवारी ऐवजी असणार संविधान

मुंबई (बारामती झटका)
भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूपात आता मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच आधी ज्या हाती तलवार होती त्या हाती संविधान दिसत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे.
प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पूतळा हा न्याय आंधळा नसतो, असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जातंय. तो संविधानाच्या आधारे काम करतो. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, असे आणखी पुतळे बसवणार की नाही, हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.
न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्यात काय विशेष आहे?
संपूर्ण पुतळ्याचा रंग पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवता साडीत दाखवली आहे. डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील आहे. कपाळावर बिंदी, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही दिसतात. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला ‘लेडी जस्टिस’ म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.