धक्कादायक प्रकार : बोगस मतदान करू देत नाही म्हणून सरपंचास शिवीगाळ करून जीवे मारण्याची, हातपाय तोडण्याची व गोळ्या घालण्याची धमकी; चार व्यक्ती विरोधात दाखल…
महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे बुथ प्रतिनिधी खुडूस गावचे सरपंच प्रा. विनायक ठवरे यांचा माळशिरस पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल…
खुडूस (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे बुथ प्रतिनिधी खुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेव ठवरे यांना बोगस मतदान करू देत नाही, असे म्हणल्यानंतर योगेश अनंतराव ठवरे, धनाजी काशलिंग लोखंडे व दोन अनोळखी इसम यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची, हातपाय तोडण्याची व गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे, असे अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिल्यानंतर माळशिरस पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023 कलम 352 351(2) 3(5) कलमा अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे.
खुडूस गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक विनायक नामदेव ठवरे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये, खुडूस गावचा रहिवाशी असून व्यवसायाने शिक्षक असून शेतीचा व्यवसाय देखील करत आहे. यातील आरोपी हे देखील खुडूस गावचे रहिवासी आहेत. दि. 20/11/2024 रोजी विधानसभा निवडणूक असल्याने यातील फिर्यादीने बीजेपी पक्षाचे वतीने बुथ क्रमांक 199 मध्ये पोलिंग एजंट म्हणून हजर राहण्याचा फार्म भरून व पुलिंग एजंट म्हणून हजर असताना काही लोक बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी सदर ठिकाणी कोणीही बोगस मतदान करायचे नाही, असे म्हणल्यानंतर आरोपींनी तू कोण सांगणार, असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची, हातपाय तोडण्याची व गोळ्या घालण्याची धमकी दिलेली आहे. म्हणून तक्रारदार यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने एन. सी. आर. रजिस्टर नोंद करून सरपंच विनायक ठवरे यांना परस्पर कोर्टात दाद मागण्याची समज देऊन योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करता पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ यांचेकडे सदरच्या अर्जाचा तपास दिलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.