दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच आमदार भरणे झाले नामदार !
इंदापूर (बारामती झटका) डॉ. संदेश शहा यांजकडून
राज्याचे क्रीडा, अल्पसंख्याक विभाग खात्याचे कॅबिनेट मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी मंत्रालयात आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारला. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे आता नामदार झाले आहेत. यावेळी क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख, अल्ताफ कुरेशी, इरफान दिवटे, जमीर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केंद्र शासनाचा अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेले पद्मश्री मुरलीधर पेटकर, द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे, गोळाफेक क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले सचिन खिल्लारी, शूटिंग क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान करून आपल्या खात्याच्या कामाचा शुभारंभ केला.
यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सर्व पक्षश्रेष्ठी, महायुतीचे पदाधिकारी यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासास निश्चित पात्र राहीन. दिलेल्या पदाचा वापर विश्वस्त वृत्तीने करून शासन व खात्याच्या सर्व योजनांचा फायदा लाभार्थ्यांना देण्यासाठी कटिबध्द आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघाचा मानसन्मान निश्चित उंचावला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
इंदापूर विधानसभा मतदार संघात सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येवून इतिहास घडविणारे इंदापूरचे आमदार आता नामदार झाले. त्याबद्दल कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
नामदार दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आपण काम केले. त्याचा फायदा निवडणुकीत झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळाल्याने तमाम इंदापूरकर यांचा अत्यंत ऋणी आहे. आता राज्याची जबाबदारी आली असली तरी इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. इंदापूर तालुक्याचा शाश्वत पाणी प्रश्न, शेती पूरक उद्योग उभारणी, बेरोजगारीसह विविध प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद नामदार दत्तात्रय भरणे यांना देण्यात यावे अशी मागणी प्रदेश सचिव इरफान शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कडे केली.
दरम्यान नामदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारताच इंदापूर येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांस पेढे भरविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध गावात जल्लोष व्यक्त करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.