जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ९ नैना पोहेकर
पुणे (बारामती झटका)
‘मी फौजदार होईल’ असे लहानपणापासून म्हणत उंच भरारी घेत आज यशाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान असलेल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदारपद भूषविणाऱ्या अकोल्याच्या महिला पोलिस अधिकारी नैना शेखर पोहेकर. जबाबदारीची जाणीव ठेवून स्वकर्तृत्वाने पुढे आलेल्या नैना पोहेकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील खेडेगाव चोंढी धरण येथे अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांची आई चौथी शिकलेल्या व वडील शेतकरी पण ते शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. गावात जेमतेम सातवीपर्यंत शिक्षणाची सोय. डोंगराळ भागात शेतीवाडीत वडिलांसोबत काम करत त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. गावात कोणत्याही सुविधा नव्हत्या. प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त भूमिहीन आई-वडिलांनी त्या शिक्षणापासून वंचित राहू नये हा विचार केला. समाज विरोधाला न जुमानता पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवायचे तर तेथे मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था नव्हती. घरची गरीबीची परिस्थिती, प्रतिकूल वातावरण, सोयी-सुविधांचा अभाव, एसटी बसेसची देखील सुविधा नव्हती परंतु त्यांच्या मनात शिक्षणाची ओढ होती. शेतात पिकांची रखवाली करताना हातात पुस्तक आणि शेतात गुरांना राखण्यासाठी काठी घेऊन धावत धावत एक पाय शाळेत अन एक पाय शेतात असे करून अंग मेहनतीची छोटी मोठी कामे करत त्या शिकत होत्या. ‘शिकण्यासाठी फी आणि पुस्तकांसाठी पैसे हवेत म्हणून शेतात मूग, उडीद निघेपर्यंत वाट पहावी लागायची. मग कुठे वडील मूग बाजारात विकायचे व गुरुकिल्ली नावाचे पुस्तक ते पण जुने अर्ध्या किंमतीत मिळायचे त्यातच आनंद वाटायचा की आपला पहिला नंबर येणार अन् खूप अभ्यास करणार. उशीरा का होई ना गुरुकिल्ली मिळालेली असायची तीही फाटलेली जुनीच, त्यालाच गोंध (डिंक) लावून चिकटवायचे, कव्हर लावून अभ्यास करायचा कारण मी पोलीस होईल, फौजदार होईल म्हणून..!’ असे त्या सांगत होत्या. वडिलांसोबत शेतात नांगरणी, झाडे तोडणे, पालव्या खोदणे, पाठीवर पंप घेऊन फवारणी करणे, मळण हाकलने ही सारी कामे करत शिकण्यासाठी फी आणि पुस्तकांसाठी पैसे हवेत म्हणून त्या इतरांच्या शेतातही मजुरीवर कामाला जायच्या.
एक शाळेतील आठवण ताई सांगत होत्या. ताईंना गणिताचे गुरुजी फार मारायचे. त्यांच्या धाकाने दुपारनंतर ताई दप्तर घेऊन घरी, दप्तर घराच्या अंगणात गाईचे कुटार ठेवलेल्या कणगेत लपवून ठेवायचे व लपत लपत ऊसाच्या शेतात जायचे व ऊस खात बसायचे हा दिनक्रम होता. शाळा सुटली की परत दप्तर घेऊन घरी. एकदिवस बाबांनी पाहिले तर बैलाच्या चऱ्हाटाने त्यांना प्रचंड चोपले. तेव्हा ताई सहावीत होत्या. आजी मधे पडली. तिने समजावले व मार कमी झाला. मग खूप अभ्यास केला अन् गणिताच्या गुरुजींच्या मुलाचा दरवर्षी येणारा पहिला नंबर घालवून ताई सहावीत पहिल्या आल्या.
दुष्काळी परिस्थिती, घरी अठरा विश्व दारिद्र्य. आई-वडिलांशिवाय कधीही कुणी कुणाचे नसते अशा परिस्थितीतून चालत जाऊन गावात सातवीची परीक्षा पास केली. पुढे अशाच खडतर परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील काटा या छोट्याशा गावात मामाकडे राहून ८ वीपर्यंत शिक्षण घेतले. ९ वी व १० वीचे शिक्षण यवतमाळला रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत झाले व राजमाता जिजाबाई वसतिगृहात रहाण्यासाठी तेव्हा १०/- रू. महिना होते. यवतमाळला असताना जिल्हा पातळीवरचे खेळात नैनाताईंनी भाग घेत शाळेचे नाव मोठे केले. उंच उडी, जलतरण अशी अनेक प्रमाणपत्र मिळवली. दहावी चांगल्या मार्कांनी त्या उत्तीर्ण झाल्या. तब्येतीने उंचपुर्या, मजबूत बघून कुणीतरी म्हणाले की तू पोलिस खात्यात भरती का होत नाही ? तेच लक्षात ठेवून धाडसी नैनाने भरती होण्यासाठी आवश्यक ती पात्रता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि मी फौजदार होईल हा विश्वास सतत मनात बाळगला, त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. सर्व माहिती मिळवली. तोवर आलेगावला अकरावी झाली. पुढचे शिक्षणासाठी पातुर या तालुक्याच्या गावात कॅालेजात नावापुरताच प्रवेश घेतला. सायंकाळी आजूबाजूची मुलं गोळा करून व्यायाम म्हणून भरपूर खेळणे सुरु केले. अकोल्याला पोलीस भरती आहे असे समजल्यावर थोड्या पैशाची जुळवाजुळव करून ताई अकोल्याला गेल्या.
त्या अगोदर त्यांनी खूप अभ्यास केला. त्यासंदर्भात काही पुस्तके मिळत नव्हती पण त्यांनी जिद्द सोडली नाही. आहे त्या पुस्तकातून मन लावून जिद्दीने अभ्यास केला. घरी लाईट नव्हते. दिव्याच्या प्रकाशातच त्यांनी एकाग्रतेने अभ्यासाची साधना आणि संघर्ष केला होता. पोलीस परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. धरणाच्या खडतर वाटेवरून रोज सकाळी रनिंग करायला त्या जात होत्या. खडकाळ जमिनीवरून अनवाणी धावायचे, कसरतीचे वेगवेगळे प्रकार त्यांनी आत्मसात केले होते. गावाच्या निर्गुणा नदीतून पोहोण्याचा सराव केला. खूप मेहनत, साधना आणि नियमित योगासने याचा सराव केला. सराव करत असताना गावातील लहान लहान मुलं आत्याबाई पळते, ती पोलिस होणार म्हणून मागे धावत जायची. अशातच एक लहान दहा वर्षाचा भाचा आला आणि धरणाच्या पाण्यात बुडला. त्याला काढण्यासाठी ताईंनी पाण्यात उडी मारली व पाय धरणाच्या दगडात पिचिंगमधे अडकला व पायाला इजा झाली. खूप सूज आली होती, चालता पण येत नव्हते वेदनाही खूप झाल्या होत्या ! पाच दिवसावर त्यांची ग्राऊंडवर अंतिम परीक्षा होती तरीही त्यांनी प्रयत्न सोडला नाही. अशा अनेक संकटातून त्यांनी पोलीस भरतीचे दिव्य पार पाडले. मुलाखतीला अनेक अडचणी आल्या होत्या पण त्यांच्या हुशारीमुळे भाला फेक, थाळी फेक, उंच उडी, धावण्याच्या शर्यतीत त्या सर्वात पुढे होत्या. जलतरणपटू म्हणूनच त्यांची नियुक्ती झाली.
पोलीस मुख्यालय अकोला येथे लेडीज पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर पोलीस वाहतूक नियंत्रक म्हणूनही काम पाहिले. दरम्यान लग्न झाले. त्यानंतरही त्यांनी खडतर अशी एमपीएससीची परीक्षा दिली त्यातही उत्तीर्ण झाल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाला नवी झळाळी मिळाली. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. या उक्तीप्रमाणे जीवनात कोणत्याही यशासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्ष म्हणजेच जीवन आहे. प्रगतीच्या खडतर वाटेवरून चालताना असंख्य यातना सहन कराव्या लागतात तेव्हा कुठे यशाचे शिखर मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व सहनशील आणि संवेदनशील आहे. आज अकोला जिल्ह्यात नामांकित ठाणेदार म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. वाशिम जिल्ह्यात अनसींग पोलिस स्टेशनच्या त्या काही वर्ष इनचार्ज होत्या तेव्हा ग्रामीण भागात बरेच गावात त्यांनी दारुबंदी केली तर काही गावं पोलिस पाटलांच्या साहाय्याने त्यांनी व्यसनमुक्त केली. सध्या त्या मुंबई दक्षिण विभागात सिनिअर पोलिस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. मुंबईसारख्या शहरात काम करण्यापेक्षा त्या विदर्भात काम करणे जास्त पसंत करतात. ग्रामीण भागात त्या मेहनत करणाऱ्यांची मुलं, पिडीत स्रीया व वयोवृद्ध यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी नेहमी तत्पर असतात. कायद्याचे पालन करणे हे त्यांचे एकच ध्येय असते. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवणे, १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणी वाईट मार्गाकडे वळणार नाही यासाठी त्या नेहमी दक्ष असतात. ड्युटी बाहेरच्या कितीतरी गोष्टी त्यांनी स्वतः सोडविल्या आहेत. अनेक तरुण तरुणांना चांगल्या मार्गाला लावले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी त्या नेहमी तत्पर असतात. महिला व मुलीची छेडछाडी होऊ नये. मुलींनी आपल्या हक्कासाठी जागरुक रहावे यासाठी त्या सतर्क असतात. पण मुलींनी स्वयं आचारसंहिता करावी व पाळावी. कपडे कसे घालावे, कसे रहावे याबाबत नेहमी शाळा,महाविद्यालयात जाऊन मुलामुलींबरोबरच पालकांना सुद्धा समुपदेशन त्या करत असतात.
गुन्हेगार, अपराध्यांसाठी वज्राहून कठीण असणाऱ्या आणि तेवढ्याच कोमल मन असणाऱ्या, देशसेवेला वाहून घेतलेल्या, पौगंडावस्थेतील मुलांना योग्य समुपदेशन करणाऱ्या या जिजाऊ-सावित्रीची फौजदार असलेली कर्तृत्ववान लेक नैनाताईंना मानाचा मुजरा. !!!
सौजन्य – रजनी ताजने
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.