ताज्या बातम्यासामाजिक

मळोली येथील श्रीमती कमल नामदेवराव जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस, येथील श्रीमती कमल नामदेवराव जाधव पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी शनिवार दि. 11/1/2025 रोजी रात्री 10 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार रविवार दि. 12/01/2025 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहेत.

श्रीमती कमल जाधव पाटील यांना कमलताई या नावाने ओळखत होते. त्यांचे मूळ माहेर दिघी अहिल्यानगर येथील निंबाळकर घराण्यातील आहे. त्यांचा मळोली येथील नामदेवराव जाधव पाटील यांच्याशी विवाह झालेला होता. कमलताई आणि नामदेवदादा यांनी चांगल्या पद्धतीने संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार दिलेले होते. नामदेव दादा यांचा 2009 साली मृत्यू झालेला होता. त्यानंतर पितृत्व व मातृत्वाची जबाबदारी कमलताई यांनी सांभाळलेली होती. निंबाळकर आणि जाधव पाटील दोन्हीही परिवार अध्यात्मिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारी घराणे आहेत. ताईंनी सांप्रदायिक वारसा सासरमध्ये चांगल्या पद्धतीने जपलेला होता. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लगतच जाधव पाटील यांचा वाडा आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज देहू संस्थांचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांचेही वास्तव्य मंदिराच्या शेजारीच आहे. मोरे परिवार यांच्या तीन पिढ्या मळोली येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर गेली अनेक वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहानिमित्त येणारे महाराज व हरिभक्त यांना ताईंनी स्वतःच्या हाताने जेवण व चहापाण्याची सोय कायम केलेली होती. त्यामुळे देहूकर फडावरील एकाही महाराजांनी ताईंच्या हातचे जेवण अथवा नाष्टा केलेला नाही, असे नाही. अशा धार्मिक वृत्तीच्या ताई होत्या.

आई-वडिलांचे संस्कार घेऊन त्यांनी सासरमध्ये अनेक प्रेमाची माणसे जोडलेली होती. सुसंस्कृत स्वभाव, चौकस बुद्धी, समोर व्यक्ती गावातील ओळखीची असो अथवा अनोळखी असो चौकशी ताई करणारच, असा त्यांचा स्वभाव होता. बोलण्यामध्ये नम्रता होती, वागण्यामध्ये सुसंस्कृतपणा होता. कधीही ताईंनी डोक्यावरचा पदर पडून दिला नाही.

हरिनामाच्या जयघोषामध्ये कमलताईंची अंत्ययात्रा निघालेली होती. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बापूसाहेब देहूकर महाराज अंत्ययात्रेत सामील होऊन निर्वाणीचे अभंग म्हणत त्यांच्यावर अंतिम संस्कार नानासाहेब व राजेंद्र या दोन्ही मुलांनी केले होते. त्यांचा रक्षा विसर्जन सोमवार दि. 13/01/2025 रोजी सकाळी साडेसात वाजता होणार आहे.

जाधव पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व ताईंच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button