अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहूर्तामध्ये स्थान का ?

मुंबई (बारामती झटका)
अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्ये केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावर्षी ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीया येत आहे. त्याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊयात.
अक्षय्य तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते. तसेच संपत्तीत वाढ होते.
अक्षय्य तृतीया का साजरी करतात…
पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
दुसऱ्या मान्यतेनुसार, या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.
तिसऱ्या मान्यतेनुसार, माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.
महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीतादेखील समाविष्ट आहे. असे मानले जाते की, या दिवशी गीतेच्या १८ व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.
नर-नारायण देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते. म्हणूनच ते शुभ मानले जाते.
महाभारतानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात ‘अक्षय्य पात्र’ दिले होते. अक्षय्य पात्र कधीच रिकामे नसते. ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे.
अशी अक्षय्य संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षय्यपणे टिकून राहावा यासाठी अक्षय्य तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपम समाविष्ट करावा.