माळशिरस तालुक्यात ग्रामसेवक यांना पदमुक्त करून सांगोला, पंढरपूर आणि माढा तालुक्यात रवानगी केली…

माळशिरस पंचायत समितीच्या 7 ग्रामपंचायत अधिकारी यांना गुड बाय..
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा ना. जयकुमार गोरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले जात आहे…
माळशिरस (बारामती झटका)
शासनाचे नियम धाब्यावर बसवून वर्षानुवर्ष पदाधिकाऱ्यांच्या खुर्ची सोबत संगणमताने कामकाज करणाऱ्या ग्रामसेवकांच्या माळशिरस तालुक्याच्या बाहेर बदल्या. पारंपारिक सत्ताधाऱ्यांशी सूत जुळवून किमान २०-२५ वर्षे एकाच तालुक्यामध्ये तसेच पाच ते दहा वर्ष एकाच ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांना धरून नियमबाह्य नेमणूका करून कामकाज करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे खुतून बसणाऱ्या १३ ग्रामसेवकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तेरा ग्रामसेवकांच्या बदल्या माळशिरस तालुक्याबाहेर केलेल्या त्वरित सदर आदेशाची अंमलबजावणी करणेबाबत गटविकास अधिकारी यांना कळविलेलेआहे. माळशिरस तालुक्यातील ट्वेंटी-ट्वेंटी वर्ष एकाच तालुक्यात खेळणारे ग्रामसेवक तालुक्याच्या बाहेर गेलेले असल्याने अनेक वर्षाची अंतर्गत खदखद संपलेली आहे.
आमची बदली कोणी करू शकत नाही आणि आमचे गाव आमच्या परस्पर किंवा आमच्या नेत्यांच्या परस्पर कोणीही काढून घेऊ शकत नाही, अशा अविर्भावामध्ये असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील बारा ग्रामसेवकांच्या बदल्या माळशिरस तालुक्याच्या बाहेर म्हणजेच सांगोला तालुक्यात एच. एस. पवार एकशिव, डी. के. गोरे दहिगाव, पी. एस. दुधाळ डोंबाळवाडी (कु), पांडुरंग एकतपुरे मोटेवाडी (मा.), एस. एन. होळ रेडे, पी. बी. काळे जळभावी, पंढरपूर तालुक्यात सतीश उरवणे मळोली, स्वाती क्षीरसागर वाफेगाव, माढा येथे एन. आर. शेख पानिव अशा ठिकाणी प्रशासकीय बदल्या झालेल्यांना माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कार्यमुक्त केलेले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे साहेब यांच्या हे लक्षात आल्याने आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या काखेमध्ये बसून प्रशासकीय सेवा बजावणाऱ्याची बदली करण्याचे आदेश मंत्रालय स्तरावरून करण्यात आले. सदर आदेशाची अंमलबजावणी म्हणून त्वरित आदेशाची अंमलबजावणी करून तडकाफडकी ग्रामसेवकांना तालुक्याबाहेर काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेले आहेत. या धाडसी निर्णयाच्या आदेशाचे स्वागत संपुर्ण माळशिरस तालुक्यात केले जात आहे. यातील जवळजवळ सर्वच ग्रामसेवक हे वीस ते पंचवीस वर्षापासून माळशिरस तालुक्यामध्येच प्रशासकीय सेवा बजावत होते. सदर सेवा बजावत असताना पदाधिकाऱ्यांच्या कानामध्ये गुप्तगु करून बाहेरील तालुक्यातील ग्रामसेवकांना माळशिरस तालुक्यामध्ये पदभार घेऊ दिला जात नव्हता. तसेच माळशिरस तालुक्याच्या बाहेर बदली करते वेळेस माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या शिफारशी जोडून बदल्या रद्द करण्याची परंपरा कायम ठेवण्यात येत होती. परंतु, माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांनी अशा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित तालुक्याबाहेर काढण्याचे काम एका आदेशाने केलेले आहे.
माळशिरस तालुक्यातील सात ग्रामसेवक यांना पदमुक्त करून सांगोला, पंढरपूर आणि माढा तालुक्यात रवानगी केली. उर्वरित ग्रामसेवक यांना पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर कार्यमुक्त करण्यात येईल असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



