“बिग ब्रेकिंग न्यूज” सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकारी निलंबित…

माळशिरस तालुक्यात खोट्या सोन्यावर खरे कर्ज खातेदार, शाखा अधिकारी व बँकेचा सोनार संगणमत आहे का ?, कोण ठरणार बळीचा बकरा…
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक कुंदन भोळे काम पाहत आहेत. कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे आहेत. गेल्या दोन वर्षापासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रतिमा मलीन झालेली आहे. माळशिरस तालुक्यात खोट्या सोन्यावर खरे कर्ज दिले आहे. सध्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातरजमा केल्यानंतर माळशिरस तालुक्यातील शाखांमध्ये सोन्याच्या कर्जकारणातील सोने पिशव्या उघडल्यानंतर धक्कादायक प्रकार बाहेर आलेले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकारी निलंबित केलेले आहेत. माळशिरस तालुक्यात खोट्या सोन्यावर खरे कर्ज दिले असेल तर त्यामध्ये खातेदार, शाखा अधिकारी व बँकेचा सोनार यांचे संगणमत आहे का ?, हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे कोण ठरणार बळीचा बकरा, अशी सहकार खात्यामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकारी यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांना सोलापूर येथे चौकशीसाठी बोलविले असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. सदरच्या शाखा अधिकारी यांची कसून चौकशी केली जाणार आहे. जर शाखा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर चौकशी करून प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. चार शाखेपैकी एका शाखेचे प्रकरण पोलीस स्टेशनकडे दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये खातेदार वेगवेगळी उत्तरे देत आहेत. शाखा अधिकारी यांनी हात झटकून, तोंडावर बोट हाताची घडी घातलेली आहे. सोनार मात्र सर्व काही मीच केलेले आहे, असे सांगत आहे. दबावापोटी का खरंच ?, त्यांनी कृत्य केलेले आहे याची सर्व खातरजमा झाल्यानंतर खरा प्रकार बाहेर येणार आहे.
सध्या तरी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोट्या सोन्यावर खरे कर्ज घेणारे खातेदार व त्यांना कर्ज देणारे शाखाधिकारी व सोन्याची पडताळणी करणारा सोनार या सर्वांच्या चौकशीकडे तालुक्यातील खातेदार कर्जदार यांचे लक्ष लागून राहिले आहे. बँकेमध्ये दिलेले खरे सोने खोटे कसे झाले, असा ज्यावेळेस खातेदार कांगावा करीत आहेत त्या वेळेला प्रशासन गप्प आहे. खरं काय आहे, याचा उलगडा होईपर्यंत संशयित वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या बँकांवरील विश्वास कमी होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी संलग्न असल्याने या बँकेने दूध का दूध व पाणी का पाणी करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी सभासद यांचा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राहणार नाही, अशी खातेदार कर्जदार व ठेवीदार यांच्यामधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



