ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यात खाजगी सावकारांचा सुळसुळाट; 10% ते 20% व्याजाच्या विळख्यात सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त, पोलिसांनी मुसक्या आवळाव्या – पीडितांची मागणी

खाजगी सावकारांची मुजोरी वाढली !!, पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत, प्रशासन गप्प का ?

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात खाजगी सावकारकीने अक्षरशः थैमान घातले आहे. अकलूज, वेळापूर, पिलीव, माळशिरस, नातेपुते, महाळुंग श्रीपुर, सदाशिवनगरसह संपूर्ण तालुक्यात सावकारांचा सुळसुळाट सुरू असून अनेक कुटुंबांची घरे-दारे उद्ध्वस्त होऊन संसार रस्त्यावर आले आहेत.

50% जनता अडचणीत, सावकारांकडून लूट
तालुक्यात 25% लोक सधन, 25% व्यापारी वर्ग तर 50% जनता ही सर्वसामान्य, भूमिहीन, अल्पभूधारक, मजूर वर्गातील आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, अचानक आलेले आजारपण, अपघात अशा संकटात ही जनता सापडते आणि याचाच गैरफायदा खाजगी सावकार घेतात.

नियमाप्रमाणे 2% पर्यंत व्याज परवडणारे असते, मात्र तालुक्यात 10% ते 20% दराने व्याज आकारणी केली जात आहे. अनेक सावकारांनी सहाय्यक दुय्यम निबंधकाकडे परवाना काढलेला असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात.

10 हजाराच्या बदल्यात 50 हजार वसूल, तरी मुद्दल शिल्लकच!
पीडितांनी सांगितले की, 10 हजार रुपये घेतले तरी 50 हजार रुपये व्याज भरूनही 20 हजार मुद्दल शिल्लकच दाखवले जाते. हिशोबच कळत नाही. वसुलीसाठी अर्वाच्य शिवीगाळ, दमदाटी, मारहाण असे प्रकार सर्रास घडतात.

पोलीस स्टेशनातही न्याय नाही ?
या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, तर काहींनी गावच सोडले आहे. काहीजण समाजातील इज्जतीपायी रात्रंदिवस काबाडकष्ट करून फक्त सावकारांचे व्याज भरत आहेत, त्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते आणि स्वप्ने डोळ्यातच राहतात.

पीडित जेव्हा पोलीस स्टेशनात तक्रार घेऊन जातात, तेव्हा पोलिसांकडूनही न्याय मिळत नाही, उलट सावकाराकडून चिरीमिरी घेऊन प्रकरण दाबले जाते, असा गंभीर आरोप पीडित जनतेतून होत आहे.

प्रशासनाने धाडस दाखवावे
माळशिरस तालुक्यासाठी उपविभागीय पोलीस कार्यालय असून अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते अशी चार पोलीस ठाणी आहेत. पोलिस प्रशासनाने सावकारांकडून हप्ते घेण्यापेक्षा पीडितांना धाडस देऊन न्याय द्यावा आणि बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी आर्त मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

सहाय्यक निबंध कार्यालयाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. सावकारकीचे लायसन असणारे लायसनधारक यांचाही व्यवहार तपासणी गरजेचा आहे. लायसन धारक नसलेले सावकार यांचा शोध घेणे गरजेचे आहे.

जर पोलिसांनी कठोरात पावले उचलली नाहीत, तर अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या पीडित जनतेने बारामती झटका चॅनल चे संपादक श्रीनिवास वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील यांच्याशी मोबाईल नं. ९८५०१०४९१४ या नंबरवर संपर्क साधावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button