ताज्या बातम्याराजकारण

शिवरत्न वाल्यांनो, आमच्यावर भरोसा नाय का ?, सोसायटीच्या मतदारांचा व नातेवाईकांचा मोहिते पाटील यांना थेट सवाल…

दहिगाव पंचायत समितीची पुनरावृत्ती होऊन वेळापूर ग्रामपंचायत पॅटर्न राबणार?, पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत मोहिते पाटील – आमचं ठरलंय असा सूर!*

अकलूज (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर संचालक मंडळ निवडणूक सन २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सोलापूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, माजी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मुकुंद पवार यांनी बाद केलेला असल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याअगोदरच मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा बँकेमध्ये कायम शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचा प्रतिनिधी बँकेत राहिलेला आहे. तीच परंपरा कायम राहावी यासाठी बँकेच्या संलग्न असणाऱ्या शेतकरी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषक सेवा सोसायटीचे जवळजवळ ८० मतदार दिवाळी फराळासाठी बोलावून फरार केलेले असल्याची सहकार क्षेत्राच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, “शिवरत्न वाल्यांनो आमच्यावर भरोसा नाय का?” असा थेट सवाल सोसायटीच्या मतदारांचा व नातेवाईकांचा मोहिते पाटील यांना करून, दहिगाव पंचायत समितीची पुनरावृत्ती होऊन वेळापूर ग्रामपंचायत पॅटर्न राबणार, पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत मोहिते पाटील असणार, असे “आमचे ठरलंय” असा सूर मतदार व त्यांच्या नातेवाईकांमधून येत आहे.

मोहिते पाटील यांना लागलेले दारुण पराभव
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची एक वेगळी ओळख होती. तरीसुद्धा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी पंचायत समिती सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे दारुण पराभव झालेले आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, दूध संस्था, मजूर संस्था अशा निवडणुकीमध्ये कायम वर्चस्व ठेवलेले होते. मात्र वेळापूर ग्रामपंचायतीमध्ये मोहिते पाटील गटाचे १० ग्रामपंचायत सदस्य होते. ग्रामपंचायत सदस्यांना शिवरत्नवर नेऊन ठेवलेले होते, देवीची परडी हातामध्ये दिलेली होती, देवबाप्पाकडून आणा-भाका झालेल्या होत्या, तरीसुद्धा विरोधी गटाचे उत्तमराव जानकर यांचे ०६ ग्रामपंचायत सदस्य असताना उत्तमराव जानकर यांना १० मते पडून विजय झालेला होता. त्याचीच पुनरावृत्ती वेळापूर ग्रामपंचायत पॅटर्न राबणार, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

माळशिरस पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पदावर अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी काम केलेले असताना सुद्धा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या चाणक्य नीतीने दहिगाव पंचायत समिती गणामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या माध्यमातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागलेली होती.

माळशिरसमध्ये १४१ मतदार, ५ उमेदवार रिंगणात
माळशिरस तालुक्यातील बँकेच्या संलग्न असणाऱ्या शेतकरी सहकारी पतपेढ्या, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषक सेवा सोसायटीचे एकूण १४१ मतदार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याअगोदर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान ज्येष्ठ संचालक शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी सहा महिन्यांपासून तयारी सुरू ठेवलेली आहे. सोसायटीच्या ठरावांमध्ये मतदानासाठी हक्क कोणाला द्यावयाचा, यासाठी गनिमी काव्याने ठराव करून घेतलेले आहेत.

मोहिते पाटील यांच्या जवळ असणारे कितीतरी मतदार असे आहेत, “मोजायला तिकडं, मतदानाला हिकडं” अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या या गटामध्ये पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी तीन मोहिते पाटील समर्थक, तर एक माजी आमदार राम सातपुते गटाचा, तर एक विद्यमान आमदार उत्तमराव जानकर गटाचा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ आलेली आहे, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्य तत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्य दूत राम सातपुते असे हुकमी एक्के अजून रणनीती ठरविण्यामध्ये शांत आहेत. तोपर्यंत मतदारांच्या पळवा-पळवीमुळे माळशिरस तालुक्यातील मतदार व नातेवाईक यांच्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आहे. मोहिते पाटील यांचा राजकीय कारकीर्दीचा अंतिम काळ समीप आलेला आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button