दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी; कष्टकऱ्यांच्या आनंदात आज सहभागी होणार – पालकमंत्री ना. जयकुमार गोरे!

कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान, बळीराजाच्या पाठीशी आधार आणि श्रमजीवींच्या आनंदात दिवाळी!
पंढरपूर (बारामती झटका)
दिवाळी हा आनंदाचा, आपुलकीचा आणि माणुसकी जपण्याचा सण! याच भावनेतून दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता शेतात राबणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या कष्टांचा सन्मान करण्यासाठी आणि विठुरायाच्या पंढरीत स्वच्छतेची सेवा बजावत नगरीचे आरोग्य जपणाऱ्या सफाई कामगारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे (भाऊ) आज दिवाळीचा आनंद या कष्टकरी बांधवांसोबत साजरा करणार आहेत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपूर येथे विठुरायाच्या नगरीतील सफाई कामगारांसोबत दिवाळी फराळ करून त्यांच्या कार्याचा गौरव करणार असून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत संवाद साधणार आहेत.
सोनके, (ता. पंढरपूर) येथे ऊसतोड मजुरांसोबत दिवाळीचा फराळ करून त्यांच्या कष्टमय जीवनातील आनंदाचे क्षण अनुभवणार आहेत. ऊसाच्या फडात घाम गाळून साखर कारखान्यांची चक्रे गतिमान ठेवणाऱ्या या श्रमिकांच्या योगदानाचा सन्मान करणार आहेत.

रड्डे, ता. मंगळवेढा येथे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. रड्डे येथील शेतकरी कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन बळीराजाच्या सुख-दुःखात सहभागी होणार आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, कष्टाने देशाची अर्थव्यवस्था उभी करणारा ऊसतोड कामगार आणि आपल्या श्रमातून शहर स्वच्छ व सुंदर ठेवणारा सफाई कामगार… या प्रत्येकाच्या कष्टाला सलाम करण्याची ही दिवाळी!
सणाच्या आनंदापेक्षा माणसांच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक महत्त्वाचे असते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपुलकीचा प्रकाश पोहोचवणारी ही दिवाळी खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव ठरणार आहे!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



