धनुष्यबाणाच्या लढाईत शिंदे गटच बाजी मारणार – खा. श्रीकांत शिंदे
अकलुज (बारामती झटका)
शिंदे गटात पन्नास आमदार आहेत. बहुमत असलेला शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना आहे.”त्या” तेरा लोकांनीच गट तयार केला आहे. त्यामुळे शिवधनुष्याच्या न्यायालयीन लढाईत आम्हीच बाजी मारुन “शिवधनुष्य” आमच्याकडेच राहील असा विश्वास ठाण्याचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी अकलुज येथे व्यक्त केला.
आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न झाली. त्यानिमित्ताने खा. श्रीकांत शिंदे पंढरपूर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी सहकुटुंब सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदु असलेल्या अकलुज येथील “शिवरत्न” वर मोहिते-पाटील कुटुंबीयांची स्वेच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य माणुस मुख्यमंत्री म्हणुन राज्याला लाभला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याचा सर्वसामान्य जनतेला आनंद झाला असुन त्याची सकारात्मक प्रतिक्रीया आज पंढरपुरात पहावयास मिळाली. मुख्यमंत्री शिंदे यांना नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटातील संजय राऊत यांच्याकडे बोलण्याशिवाय काहीच उरले नसल्याचा टोलाही यावेळी खा. शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.
मुख्यमंत्री यांनी पंढरपूर येथे थेट जनतेशी संवाद साधला, राऊत यांनी मुंबईमधुन बाहेर पडायला हवे. त्यांच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. पंढपुरचा प्रतिसाद त्यांनी पहावा, अशी कोपरखळीही यावेळी खा. शिंदे यांनी राऊत यांना मारली. मात्र आदित्य ठाकरे यांच्या “निष्ठा” यात्रेवर बोलणे मात्र खा. शिंदे यांनी आवर्जून टाळले. सदर प्रसंगी भाजप आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सचिव धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng