जावयाने सासऱ्याच्या घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचे दागिने केले लंपास…
हडपसर (बारामती झटका)
सासऱ्याच्या घरातच घरफोडी करून चोरी करण्याचा प्रकार जावयाने केला आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. दि. 10 जुलै 2022 रोजी विश्वजीत अशोक कांबळे यांच्या घरामध्ये दुपारी ही घरफोडी झाली होती. कांबळे यांच्या घरातील इतर मंडळी दुपारी चित्रपट पाहायला गेल्यानंतर ही घरफोडी झाली.

घरात घरफोडी करताना कोणतीही तोडफोड दिसली नाही, त्यामुळे ही घरफोडी कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने केली असावी, असा पोलिसांचा संशय होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. संशयावरून पोलिसांनी विश्वजीत अशोक कांबळे यांच्या घरातील इतर व्यक्तींकडे विचारपूस केली. त्यादरम्यान कांबळे यांचे जावई निखिल संभाजी पवार यांनी स्वतःच्या सासरच्या घरात डुप्लिकेट चावीच्या माध्यमातून घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे.


या प्रकरणात निखिल संभाजी पवार याला अटक करून हडपसर पोलिसांनी साडेतीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. हडपसर भागातील शिवाजी जनार्धन पाटील या वकिलांचे दागिने चोरणाऱ्या जमील आयुब शेख या आरोपीला देखील हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. जमील शेख यांच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने हडपसर पोलिसांनी जप्त केले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
