पुरंदावडे सदाशिवनगर गावाला कोणी वाली होतं का ? वाली ?, असं म्हणण्याची व्यापारी, ग्रामस्थ व माता-भगिनी यांच्यावर दुर्दैवी वेळ आली…
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते तिन्ही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे, माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी लक्ष देण्याची मागणी.
सदाशिवनगर पुरंदावडे गाव पुन्हा बंद, आमरण साखळी उपोषण करणार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी डोळे उघडावे, ग्रामस्थांची मागणी.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर पुरंदावडे गावातून जाणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 वरील उड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलम मध्ये करणेबाबत जोपर्यंत कामाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत, प्लेटच्या उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्यासाठी सदाशिवनगर पुरंदावडे गावातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी, ग्रामस्थ यांनी दि. 03/08/2022 रोजी पुन्हा गाव बंद ठेवलेले आहे.


सदाशिवनगर ग्रामपंचायत समोर उड्डाणपुलाच्या बाजूचे काम बंद करण्याचे आदेश जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत दि. 05/08/2022 पासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा उड्डाणपूल संघर्ष समिती यांनी दिलेला होता. त्याप्रमाणे आज संपूर्ण दोन्ही गावातील व्यापारी व उद्योग व्यवसायीक यांनी कडकडीत बंद पाळलेला आहे.
पुरंदावडे सदाशिवनगर गावाला कोणी वाली होतं का ? वाली ?, असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ व्यापारी, ग्रामस्थ व माता-भगिनी यांच्यावर आलेली आहे. माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते या भाजपच्या तिन्ही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तामामा भरणे व काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी तरी लक्ष द्यावे.


सदाशिवनगर पुरंदावडे गाव पुन्हा एकदा बंद झाले आहे. आमरण साखळी उपोषण करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी तरी डोळे उघडावे, असा ग्रामस्थांचा आक्रोश सुरू आहे.

कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर रस्त्याच्या महामार्ग विस्तारीकरणात सदाशिवनगर पुरंदावडे दरम्यान प्लेटोच्या उड्डाणपूलाचे काम सुरू झालेले आहे. व्यापारी व ग्रामस्थांच्या लक्षात आले, प्लेटच्या उड्डाणपूलामुळे दोन्ही गावाचे अस्तित्व धोक्यात येऊन व्यापारी वर्गातील लोकांना स्थलांतरित झाल्याशिवाय गत्यंतर नाही. अशी परिस्थिती उद्योग, व्यवसायिक व स्थानिकांची झालेली आहे.
ग्रामस्थांचा उड्डाणपुलाला विरोध नाही मात्र, प्लेटऐवजी कॉलममध्ये उड्डाणपूल तयार करावा, या मागणीसाठी पुरंदावडे सदाशिवनगर गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी, ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचा रास्ता रोको सुरू झाला आहे. या रास्ता रोकोमध्ये जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या दोन्ही गावच्या लेकी अस्तित्वाच्या लढाईसाठी रणरागिनी काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आलेल्या होत्या.


आजपर्यंतच्या आंदोलन व मोर्चाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जैन समाजातील भगिनी रस्त्यावर काळे झेंडे घेऊन रणरणत्या उन्हात सहभागी झालेल्या होत्या. लोकप्रतिनिधी मताचा जोगवा मागताना दारोदारी फिरता, आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येत असेल तर लोकप्रतिनिधींना जनाची नाही, मनाची तरी बाळगायला पाहिजे, असा तीव्र नाराजीचा सूर महिलांमधून येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

