“आई जेवू देईना अन्, बाप भीक मागू देईना ‘अशी अवस्था श्रीपुर ते पंधरा सेक्शन रस्त्यावर प्रवास करणाऱ्या व स्थानिक नागरिकांची आहे..
श्रीपुर ( बारामती झटका )
माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील १४ गावे असणाऱ्या गावांमधील श्रीपुर ते पंधरा सेक्शन रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. सदरच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या व स्थानिक नागरिकांची “आई जेवू देईना अन्, बाप भीक मागू देईना अशी दयनीय अवस्था झालेली आहे. सदरच्या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणारे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दूध उत्पादक, शेतकरी, व्यापारी, कामगार व स्थानिक नागरिक यांना खडतर अशा रस्त्याचा प्रवास दैनंदिन करावा लागत आहे.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात श्रीपुर उद्योग, व्यवसाय, शिक्षण व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव समजले जाते. श्रीपुरपासून ३ किलोमीटर अंतरावर १५ सेक्शन आहे. दरम्यानचा रस्ता एवढा खराब झालेला आहे कि, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झालेली आहे. पंधरा सेक्शनपासून उंबरे वेळापूर व नेवरे या दोन्ही गावांना रस्ता जात आहे. दोन्हीही गावाकडे जाताना रस्ता चांगला आहे. मात्र, पंधरा सेक्शनपासून श्रीपुरकडे येणारा ३ किलोमीटर रस्ता एवढा खराब आहे की, सदरच्या रस्त्याला रस्ता म्हणणे सुद्धा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लाज वाटावी, अशा पद्धतीचा झालेला आहे.
सदरच्या रस्त्याची स्थानिक नागरिकांकडून कानोसा घेतल्यानंतर माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे सदरच्या रस्त्याला निधी देण्यासाठी तयार आहेत. मात्र, तालुक्यातील राजकीय मंडळी जाणीवपूर्वक स्थानिक नागरिक यांना दिशाभूल करीत असल्याने सदरचा रस्ता नेत्यांच्या श्रेय वादात अडकलेला आहे. याचा फटका वाहनधारकांसह शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण यांच्यासह दूध उत्पादक, व्यावसायिक, शेतकरी बांधव यांना बसत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे कि, आमदारांचा निधी का नको आम्ही त्यांना मते दिलेली आहेत. आमदार सुद्धा निधी देण्यासाठी तयार आहेत मग कुठं पाणी मुरतंय, याचा शोध श्रीपुर ते पंधरा सेक्शन दरम्यान प्रवास करणाऱ्या पीडित यांच्यामधून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng