रोडरोमिओंच्या त्रासामुळे शाळकरी मुलींना नाहक त्रास

बारामती झटका न्युज
खुडूस गावातील रोडरोमिओंच्या त्रासामुळे शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले. शाळेतील मुलींना शाळा व महाविद्यालयात येता-जाता रोडरोमिओंच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यावर शालेय परिसरात विद्यार्थ्यांना संरक्षण देऊन पोलिस प्रशासनाने रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.
खुडूस गावातील महालिंगेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुलींना जीव मुठीत धरून जावे लागते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रोडरोमिओ दुचाकी वेगाने चालवतात. तसेच मुलींजवळ जाऊन जोरात हॉर्न वाजवतात. शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस शाळेसमोर टुकार टोळक्यांकडुन हे प्रकार अनेकदा घडले आहेत. आणि आजही घडताना निदर्शनास येत आहेत.

तसेच विनापरवाना वाहनधारक मुलेही दुचाकी वेड्या-वाकड्या, अतिशय वेगात गाड्या चालवतात. यावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. माळशिरस पोलीस स्टेशनची कामगिरी ही खूप चांगल्या पद्धतीची आहे, त्यामुळे अशा टुकार रोडरोमिओ यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून शाळकरी मुलींना मनमोकळे निडरपणे शाळेत येता यावे, अशी खुडूस गावातील पालक व ग्रामस्थांची मागणी आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.