अमित ठाकरे यांच्या हस्ते रविवारी मनसे केसरी चषक कुस्ती फडाचे उद्घाटन – मनसेचे नेते दिलीप धोत्रे
सोलापूर (बारामती झटका)
मंगळवेढा येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनसे केसरी चषक कुस्ती फडाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मनसे कसरी – २०२४ या कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हा आखाडा रविवारी दुपारी ३ वा. मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर कुस्त्यांचा फड रंगणार आहे. यावेळी कुस्तीपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचे मैदान मिळावे, यासाठी या मनसे केसरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करीत आहे. मंगळवेढा येथील मनसे केसरी या स्पर्धा जीवात जीवमान असेपर्यंत घेण्याचा निर्धारही यावेळी धोत्रे यांनी व्यक्त केला.
या मैदानात पै. प्रणित भोसले व पै. सागर चौगुले, पै. समाधान कोळी व पै. सुमित आसवे, पै. बालाजी मळगे व पै. समर्थ काळे, पै. विजय धोत्रे व पै. अजय नागणे, पै. कामण्णा धुमुकनाथ व पै. राजेंद्र नाईकनवरे, पै. दिग्वीजय वाकडे व पै. अमर मळगे, पै. सुनिल हिप्परकर व पै. सौरभ घोडके, पै. रणजित घोडके व पै. शंकर गावडे, पै. यश धोत्रे व पै. शंतनु शिंदे यांच्याही कुस्त्यांचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. या कुस्ती मैदानात मोठे रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, कुस्ती सम्राट अस्लम काझी, माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे, दामोदर घुले, भिमान्ना माळी, सोमनाथ सुर्वे, महेंद्र देवकते हे काम पाहणार आहेत.
पाच लाख बक्षिसाच्या दोन कुस्त्या
मनसे केसरी – २०२४ मध्ये पाच लाख रुपये बक्षीसासाठी दोन कुस्त्या होणार आहेत. महाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे पै. आशिष हुड्डा यांच्यात कुस्ती रंगणार आहे. दुसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व दिल्लीचा पै. दीपक कुमार यांच्यात रंगणार आहे. दोन लाख रुपये बक्षीसासाठी पै. माऊली जमदाडे व पै. रोहित दलाल, एक लाख रुपये बक्षीसासाठी पै. उमेश चव्हाण, पै. संग्राम साळुंखे, पै. तात्या जुमाळे, पै. विजय शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे. तर पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीसासाठी पै. ज्योतिबा आटकळे, पै. संग्राम अस्वले, तर पन्नास हजार रुपये बक्षीसासाठी पै. सौरभ घोडके व पै. सुनील हिप्परकर यांच्यात कुस्त्या होणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.