Uncategorizedताज्या बातम्या

विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंग सावळ्याच्या अंगणी…

खुडूस येथे माऊलींचा रिंगण सोहळा लाखो वैष्णवांनी नेत्रदीप टिपला

खुडूस (बारामती झटका)

विठ्ठलाची श्वास विठ्ठल विश्वास |
विठ्ठल सकल कर्मांचा सुवास ||
जनात देखीला विठ्ठल सावळा |
सावळ्याचा सारा असे गोतावळा
||

असा प्रत्येकाच्या अंतकरणी असलेला भाव, शंख व तुतारीची ललकारी, पताकांची झळाळी आणि मृदुंगाचा शिगेला पोहोचलेला निनाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण सोहळा खुडूस ता. माळशिरस, येथे रंगला आणि तो लाखो वैष्णवांनी लक्ष लक्ष नेत्रांनी टिपला‌. सकाळपासून ढगाळ वातावरण होते, अशातच रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या.

माळशिरस येथील एक दिवसाचा निरोप घेऊन श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा खुडूस येथे रिंगणस्थळी ८.३५ वा. पोहोचला. खुडूस येथे रंगलेला गोल रिंगण सोहळा दुपारच्या धावा आणि धाव्यानंतर हास्याची उधळण करत जमलेल्या भारुडाच्या मैफिलीने पालखी सोहळा भक्ती सागरात डुंबून गेला.

यंदा राज्यात पाऊस नसल्यामुळे भाविकांची संख्या कमी असल्याचे जाणवत होते‌. वारकऱ्यांच्या चेहर्यावर सावळ्या विठुरायाच्या ओढीबरोबर काळ्या आईची चिंता दिसून येत होती. भाविकांच्या गर्दीने रिंगण सोहळ्याचे मैदान फुलून गेले होते‌. ज्ञानेश्वर महाराज पालखीचे माजी सरपंच ॲड. शहाजी ठवरे पाटील, बाळासाहेब वावरे, डॉ. तुकाराम ठवरे, ॲड. धनाजी ठवरे, ग्रामसेवक सत्यवान पवार, तलाठी सोमनाथ माने, डोंबाळवाडीचे सरपंच ब्रह्मदेव डोंबाळे, संजय देशमुख, मारुती देशमुख, सरपंच विनायक ठवरे, अभिजीत वाघ, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक रामचंद्र ठवरे, जयवंत सिद, धनाजी ठवरे यांनी स्वागत केले. सर्वप्रथम भोपळे दिंडीचा जरीचा पटका असलेला ध्वज घेऊन मानकर्यांनी प्रथम फेरी पूर्ण केली.

माऊलींचा अश्व व शितोळे सरकारच्या स्वारांच्या अश्वांनी पाहण्यासाठी एक फेरी मारली. लाखो जनसागराला रिंगण सुरू होण्याची उत्सुकता लागली होती. दिंड्यांमधून टाळ मृदुंगाच्या तालावर माऊली… माऊली…, असा जयघोष दुमदुमला होता. फुगड्या, झिम्मा अशा खेळांनी वेग घेतला होता. अशा वातावरणात चोपदार यांनी अश्व सोडला. स्वारांच्या, माऊलींच्या जयघोषात रिंगण सोहळा रंगून गेला आणि तो वैष्णवांनी ‘आनंदाचे डोई, आनंद तरंग’ असा पहावयास मिळाला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी खुडूस, माळशिरस, पानीव, निकमवाडी, निमगाव, डोंबाळवाडी, घुलेवस्ती, शिपाईवस्ती, आंबेमळा, विझोरी, विजयवाडी, शिवतेजनगर अशा छोट्या मोठ्या गावातील लोकांनी व महिलांनी अलोट गर्दी केली होती‌. खुडूसच्या रिंगणाची चोख व्यवस्था ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सत्यवान पवार, गाव कामगार तलाठी सोमनाथ माने यांनी केली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great read! The depth and clarity of your analysis are impressive. If anyone is interested in diving deeper into this subject, check out this link: DISCOVER MORE. Looking forward to everyone’s thoughts!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button