दहिगाव उपसा सिंचनमध्ये देवळाली गावचा समावेश करा, मुख्यमंत्र्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यातील उजनी धरणावरून सुरू असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी २४ गावांना मिळत आहे. देवळाली गावच्या सीमेवर व हद्दीत हे पाणी आले आहे. सिंचन योजनेचे आगामी काळात बंद पाईपलाईनद्वारे पाणी येणार असल्यामुळे पाण्याची मोठी बचत होणार आहे. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष नारायण खंडागळे यांनी या योजनेत गावचा समावेश करा, अशी मागणी केली होती. तसा सर्वे सुद्धा झाला होता. राजकीय खेळीमुळे देवळाली गावचा समावेश होऊ शकला नाही
केवळ कॅनॉलसाठी एक कोटी रुपये खर्च केले तर देवळाली परिसरातील सर्व क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटणार आहे. या योजनेत देवळाली गावचा समावेश करावा, अशी मागणी राहुल कानगुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पत्रावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून महेश चिवटे यांचे देवळाली ग्रामस्थ आभारी असल्याचे राहुल कानगुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे, सचिन कानगुडे, गोरख पवार, संकेत कानगुडे, दिगंबर कानगुडे, दादा फुके, सुधीर आवटे, विशाल ढेरे यांनी भेटून गुरुवारी निवेदन दिले होते. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.