दुसऱ्यांसाठी काम करणारे दुर्मिळ होत आहेत – जेष्ठ समाजसेवक डॉ. विनोद शहा
बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे कार्यकारी संपादक आदेश कदम पाटील यांनी ‘जीवनरक्षक’ पुरस्कार स्वीकारला
पुणे (बारामती झटका)
सुसंगत फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे जीवनरक्षक सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉक्टर्स, नर्स, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, अग्निशामक अधिकारी/कर्मचारी, पत्रकार यांचा समावेश होता. यामध्ये बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना ‘जीवनरक्षक’ पुरस्कार जाहीर झाला होता. सदरचा पुरस्कार कार्यकारी संपादक आदेश कदम पाटील यांनी स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक डॉ. विनोद शहा म्हणाले की, आपण सर्व सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रयत्न करू. डॉ. न्हाळदे यांनी सेल्फमेड स्वतःचे आयुष्य स्वतः घडवले. संस्कारांच्या खऱ्या शिल्पकारांचा आजपर्यंत सन्मान केला. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे तुकारामांची गाथाच होय. सुसंगत फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा व संस्कृतीची उंची ते वाढवत आहेत. असे काम आपण सर्वांनी करावे व अशाच कार्यक्रमांची कृतज्ञता व्यक्त करून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी पुढे जायला हवे.
कार्यक्रमातील उपस्थित डॉक्टरांविषयी ते म्हणाले की, रुग्णांची सेवा डॉक्टर करत असतात पण, त्यालाही मर्यादा असतात. शेवटी परमेश्वरच अंतिम असतो. आपण सर्व जीवनरक्षक पुरस्कार सन्मानार्थी खऱ्या अर्थाने समाजातील व्यक्तींचे जीवनरक्षक आहात. सध्या हे दुर्मिळ होत चालले आहे. दुसऱ्यांसाठी जो जगतो तोच खरा मानव होय. हे पवित्र कार्य आहे. नराचा नारायण होणे गरजेचे आहे. समोरच्या प्रत्येक व्यक्तींमध्ये आपण परमेश्वराचा अंश बघावा आणि आपण सर्वांनी हेच केल्यामुळे आपला संवाद व प्रशंसा या कार्यक्रमाद्वारे सुसंगत फाउंडेशन पुणे करत आहे. जीवनावर प्रेम करून ध्येय जपून स्वतः शिल्पकार बना. परमेश्वरासाठी आपण काय करावे, आपण त्याची परतफेड करावी, तसेच आपल्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून हा आपला सर्वांचा सन्मान होय. इतरांचा आनंद हृदयाला भिडवणारा असा असतो.
या कार्यक्रमातून डॉ. शहांच्या असे लक्षात आले की, आत्महत्येपासून परावृत्त करणारे समाजसेवक, रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, समाजातील शासनाचे दोष दाखवून देणारे व जे चांगले आहे ते समाजासमोर आणणारे पत्रकार, महापुरातून तसेच अग्निप्रलयाच्या वेळेस मानवाचे प्राण वाचवणारे अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजात शांतता राखण्याचे काम करणारे पोलीस अधिकारी हे खरोखरच धन्य आहेत. काही वेळेस चांगले काम करत असताना समाजातील दुष्ट प्रवृत्तींकडून आपल्यासारख्यांवर हल्ले होतात, त्याकडे आपण लक्ष देऊ नये. म्हणून ‘चलेंगे साथ… साथ, हम होंगे कामयाब असे म्हणत आपण सर्व भारताचा स्वर्ग करण्याचे ठरवूया.
यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार माजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे अनुभव कथन केले. नक्षलवाद्यांच्या समस्या, बलात्कारांच्या समस्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करायचे आहे. जातीयता अजूनही समाजात आहे ती नष्ट व्हायला हवी. समाजातील नेत्यांना जातीत बंदिस्त केले आहे, हे योग्य नव्हे असेही ते म्हणाले.
सत्कारार्थींच्या वतीने डॉ. एन. एस. देवी, डॉ. निर्मला सरपोतदार, डॉ. सोमनाथ सलगर ,डॉ. सदानंद राऊत यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते तसेच सचिन कुलकर्णी, सुरेश यादव, डॉ. समीर पोतनीस, निलेश पायमोडे, गोविंद दिघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी प्रास्ताविक केले व माणिक सोनवलकर यांनी सूत्रसंचालन केले. तर धोंडीराम गडदे यांनी आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा