एक आठवण – आणि सुनंदा काकूंनी माझ्या बनियनला लेकीचे नाक पुसले
बारामती झटका
सध्या मुंबईहून श्री संत चोखामेळा यांच्यावरती सिनेमा काढण्यासाठी एक टीम विनय धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात आली आहे. आणि योगायोगाने श्री धुमाळे साहेब हे आमच्या किल्ला भागातील वैभव मोडक यांचे मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्याकडे उतरले आहेत. अर्थातच आम्ही गल्लीतील बालमित्र. त्या सगळ्या टीमची वैभव यांनी ओळख करून दिली. आज सकाळी सकाळी सहज भेटावे, म्हणून मोडक यांच्या वाड्यात गेलो, तर ही मंडळी पंढरपूरला गेली होती. अर्थात विशाखा वहिनी या देखील आमचे गृहमंत्री शुभदा हीची मैत्रीण आहे.
मी आणि वैभव सोप्यामध्ये थोडेसे बोलत होतो, वैभव ची कामाची लगबग चालू होती. मी सहज स्वयंपाक घरात डोकावले तर विशाखा वहिनी स्वयंपाक करीत होत्या आणि जवळच स्टूल वरती आमची मंडळी बसली होती. विशाखा वहिनीचे नेहमीप्रमाणे काय घेणार भाऊजी म्हणून प्रश्न आला, मी काही बोलण्याच्या आतच आमच्या सौ नी यांचा गुरुवार उपवास आहे म्हणून पुष्टी जोडली, तरी देखील विशाखा वहिनींनी टेबल वरती असलेल्या वाटी तील पेढे माझ्यासमोर धरले. मी एक पेढा खाल्ला तोपर्यंत वैभव देखील आला. माझे लक्ष सहज स्वयंपाक घरात इकडे तिकडे जात होते, समोर देवघर दिसले आणि का कोणास ठाऊक मला सुनंदा काकूची म्हणजे वैभवच्या आईची आठवण झाली. माझे मन बालपणात गेले. स्वयंपाक घराची रचना आहे तशीच होती, आता फरशी आणि गिलावा वगैरे सुधारणा केल्या असल्या तरी पूर्वीच्या जुन्या लाकडी खुंट्या आहेत तशाच होत्या व आहेत. मी उभा असलेल्या जवळच्या खुंटी कडे पाहिले तर तिथे एक टॉवेलचा तुकडा लटकत होता. मला एकदम १९६६-६७ साल आठवले. त्यावेळी मी मुंजा म्हणून सुनंदा काकूकडे जेवायला गेलो होतो. त्यावेळी त्याच खुंटीच्या खाली बसलो होतो. भडजी म्हटल्यानंतर अंगातील बनियन काढून मी त्याच खुंटीवर अडकविले होते. मला जेवायला सुनंदा काकू वाढत होत्या. तेवढ्यात त्यावेळी घरात लहान असणारी दोन वर्षाची वैशाली आईच्या मागे मागे रडत फिरत होती, म्हणून सुनंदा काकूंनी तिला उचलून घेतले तर वैशालीचे नाक गळत होते, अनावधानाने नकळत सुनंदा काकुनी खुंटीवरील माझे बनियन घेऊन वैशालीचे नाक पुसले होते, मला खरं तर खूप राग आला होता, पण काही बोललो नाही, कसेतरी जेवण उरकले आणि बनियन घेऊन घराकडे धूम ठोकली आणि पहिल्यांदी बनियन धुऊन टाकले.
त्यावेळी ठरविले की पुन्हा सुनंदा काकुकडे जेवायला गेले की बनियन काढायचे नाही. आता सुनंदा काकू नाहीत परंतु, त्यांच्या हातचे कोकणी पद्धतीचे चविष्ट जेवण अजूनही जिभेवरती आठवणीत आहे. मला असे काही पण आठवत राहते.
सुनंदा काकूंचे माहेर कोकणात दापोली. लहानपणी ऐकलेले त्यांच्या माहेरचे आडनाव दांडेकर आणि त्यांचे राजकमल भांडी स्टोअर्स आहे, असे देखील ऐकले होते आणि आता तेथील श्रीपाद दांडेकर वकील हे सध्या देखील माझ्या संपर्कात आहेत. आम्ही १९८९ साली दहा जण अमरनाथ यात्रेसाठी गेलो होतो. त्यावेळी रामभाऊ बेंद्रे हा गणेश काकांचा मित्र त्याच्या आग्रहाखातर गणेश काका अमरनाथ यात्रेला यायला तयार झाले होते. त्यावेळी सुनंदा काकुनी मला बोलावून सांगितले होते, हे बघ रमेश, मी तुझ्या विश्वासावरती काकांना पाठवीत आहे, लक्ष ठेवायचे, मी हो म्हणालो. आणि सांगायला आता हरकत नाही परंतु आम्ही अमरनाथ ला जाताना श्रीनगरला एका हाऊसबोट मध्ये मुक्काम केला होता. तिथून लाल चौकातून पुढे जाऊन बटमालू स्टॅन्ड वरून बसने मुक्कामाला बालताल बेस कॅम्पला गेलो. तो रस्ता मिलिटरी चा होता, पण १६ किलोमीटर पूर्ण चढण होती आणि दुसरा मार्ग पहेलगाम मार्गे होता त्या रस्त्याने अमरनाथ ४६ किलोमीटर पडते, दोन मुक्काम पडतात. यावरून खडी चढण असलेल्या रस्त्याचा अंदाज यावा, पूर्णपणे हिमालयात बर्फाच्छादित रस्ता होता. वाट एकदम अरुंद होती चार ते पाच फूट रुंदी फक्त. वाटेच्या एका बाजूला तीन हजार फूट खोल दरी, तर दुसऱ्या बाजूला तीन हजार फूट उंच कडा होता. त्या चार-पाच फूट वाटेवरूनच जाणारे पण आणि येणारे पण, याशिवाय मधूनच खलाशी आणि खच्चर आडवे यायचे, त्यावेळी डोंगराच्या बाजूला पाठ करून उभे राहावे लागायचे, कारण दुसऱ्या बाजूला खोल दरी होती, दरीत जर कोणी पडले तर वरून दिसते, परंतु काढायला जाऊ शकत नाही, अशी बिकट अवस्था होती. आम्ही जिथे राहूटी म्हणजे टेन्ट मध्ये अमरनाथ गुहेच्या पायथ्याला थांबलो होतो, तिथून पहाटे दोन वाजता उठून अमरनाथ गुहेकडे चालायला सुरुवात केली. रात्री २ वाजता फटफटीत उजेड पडला होता, बिन अंघोळीचे दर्शन कसे घ्यायचे, म्हणून जवळच वाहणाऱ्या बर्फाच्या पाण्याच्या नदीत घोटाभर पाण्यात उभे राहून म्हशीच्या अंगावर पाणी शिंपडतात तसे स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडून घेतले, बर्फाचेच पाणी ते, एकदम थंडगार पाच मिनिटात बाहेर, परंतु बाहेर आल्यावर आपले घोट्यापर्यंतचे पाय तिथेच पाण्यात राहिलेत की काय असे वाटावे, इतके बधीर झाले होते. ही झाली एक बाजू. परंतु तिथे राहुटीमध्ये राहिल्यावर गणेश काकांनी मनाचा धीर सोडला आणि म्हणाले मी काही पुढे चालू शकत नाही, तुमचे तुम्ही जाऊन या. मोठा प्रश्न निर्माण झाला होता, पण काय करावे, मार्ग तर काढावा लागणार होता. म्हणून त्या राहुटीच्या मालकास सांगून ठेवले की आम्ही परत येईपर्यंत या काकांना काय पाहिजे ते खायला देणे आणि ते आम्ही येईपर्यंत इथेच राहतील, झोपतील, असे सांगून आम्ही दर्शनासाठी मार्गक्रमण केले.
अमरनाथ वरुन दर्शन करून खाली राहुटी मध्ये आलो तर काय ? गणेश काका गायब, कुठेच दिसेनात. मन सैरभैर झाले होते. त्या राहूटी वाल्यांना विचारले तर त्यांनी सांगितले वह तुम्हारा आदमी चला गया. तसेच टेन्शन घेऊन श्रीनगरला परत आलो, तो दिवस होता, १५ ऑगस्ट १९८९ आम्ही बटमालू या स्टॅन्ड वर उतरलो तर तिथून चार-पाच किलोमीटर लाल चौकातील आमच्या ठिकाणी चालत येताना आमच्याबरोबर दहा-बारा आर्मीचे जवान होते कारण श्रीनगर मध्ये कर्फ्यू होता, पण आम्ही यात्रेकरू म्हटल्यावर बंदोबस्तात त्यांनी आम्हाला सोडण्याचे ठरविले. लाल चौकात आलो तर आमच्या देखत तेथील हजारो अतिरेक्यांनी भारताचा तिरंगा जाळला होता, आम्ही काहीही करू शकलो नाही, इतकी दहशत होती, सगळ्यांच्या हातात बंदूका होत्या. ती हिंदू काश्मिरी पंडितांना हाकलून देण्याची सुरुवात होती. आम्ही कसेबसे हाऊस बोट मध्ये आलो, तर तेथील मोहम्मद नावाच्या मालकाकडे गणेश काकांची चौकशी केली, तर त्यांनीही तेच सांगितले वह तुम्हारा आदमी बॅग लेके चला गया. आमची पाचावर धारण बसली, करायचे काय? मला तर काहीच सुचत नव्हते. त्यावेळी मोबाईल फोन यंत्रणा वगैरे अद्यावत असे काही नव्हते. म्हणून मग जम्मूला आल्यावर तिथून पोस्टातून एक पोस्ट कार्ड घेऊन मी मंगळवेढा ला घरी पाठविले आणि त्यामध्ये लिहिले की गणेश काका आम्हाला न सांगता निघून तिकडे आले आहेत, पण कोणालाही न सांगता तिथे ते घरी आले आहेत का किंवा दिसतात का ? लक्ष ठेवणे. आमच्या पुढचा प्रवास तसा जरी प्रेक्षणीय स्थळे पाहत होता, तरी देखील माझे लक्ष मात्र गणेश काका साठी मंगळवेढ्याकडे लागले होते. परतीचा प्रवास सुद्धा सोपा नव्हता. श्रीनगर ते जम्मू, तिथून जम्मू तावी रेल्वे स्टेशन वरून झेलम एक्सप्रेस ने दौंड किंवा पुण्याला यावे लागणार होते तिथून पुन्हा मंगळवेढा असे रेल्वे बस बदलत बदलत यावे लागणार होते त्यामुळे गणेश काकांची जास्त काळजी वाटत होती. आम्ही आठ दिवसांनी घरी आलो मी इथे आल्यावर पहिल्यांदी प्रश्न विचारला पत्र मिळाले का घरून उत्तर मिळाले, नाही म्हणून, मला पुन्हा टेन्शन, मग गुपचूप जाऊन वाकून पाहिले तर गणेश काका मोडकवाड्यात घरी पोहोचले होते आणि विशेष म्हणजे आम्ही मंगळवेढ्यात पोहोचल्यानंतर आठ दिवसांनी मागाहून ते पत्र मंगळवेढ्यात पोहोचले. त्यावेळी मंगळवेढ्यात आल्यावर मी सुनंदा काकू पाशी जाऊन काकांनी आमची कशी परीक्षा घेतली ते सविस्तर सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आले होते. त्यावेळी उलट काकूंनीच माझी समजूत काढली होती आणि डोळे पुसले होते.
सदरची अमरनाथ यात्रा त्यावेळी फक्त प्रत्येकी दोन हजार रुपयांमध्ये पूर्ण झाली होती. आता गणेश काका पण नाहीत आणि सुनंदा काकू पण नाहीत आठवणी मात्र काल घडल्यासारख्या सर्व डोळ्यासमोर आहेत, पाठ आहेत. मोडकाच्या स्वयंपाक घरातील त्या खुंटीच्या टॉवेलच्या तुकड्याने मला माझे त्या वेळचे बनियन आठवले आणि …….. आता वैशाली चंद्रशेखर फडके झाली असून सांगलीला असते, त्यांचे मोठे आयुर्वेदिक मेडिकल दुकान आहे, तिलाही मुलगा व सून आहे, पण मला मात्र आज सकाळी मोडकाच्या स्वयंपाक घरात गेल्यानंतर दोन वर्षाची वैशाली आठवली. जसे घडले तसे लिहिले, त्यामुळे वैशाली माझ्यावर रुसणार नाही अशी अपेक्षा करू या.
@ ॲड. रमेश जोशी मंगळवेढा
मो. नं. ८२७५५०६०५०
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
Baddiehub very informative articles or reviews at this time.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/