ताज्या बातम्यासामाजिक

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या बळावर माळशिरसच्या नगरसेविका रेश्माताई टेळे बनल्या विधीज्ञ

माहेर-सासर दोन्हीकडे पहिली महिला वकील – प्रेग्नेंसी, नगरसेविका पद गमावणे, बस प्रवास सगळं झेललं

माळशिरस (बारामती झटका)

“स्त्री म्हणजे फक्त घर आणि मुलं” ही धारणा माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका रेश्माताई सूर्यकांत टेळे यांनी खोटी ठरवली आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी वकिलीची पदवी मिळवली आहे. आज त्या गोरगरीब आणि पीडित जनतेच्या विधीज्ञ बनल्या आहेत.

रेश्माताईंचा जन्म माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच चुणचुणीत असलेल्या मुलीकडून आई-वडिलांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तरंगफळ व श्रीनाथ विद्यालय तरंगफळ येथे झाले असून दयानंद कॉलेज सोलापूर येथे ज्युनिअर कॉलेज शिक्षण झाले. लग्नानंतर, प्रेग्नेंसीच्या काळात मुक्त विद्यापीठ नाशिकमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. तर आता कौटुंबिक तसेच विविध राजकीय, सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनी लॉ कॉलेज, फलटण येथे वकिलीचे शिक्षण घेतले.

स्वप्नाला पंख दिले पतीने
वकील होणे हे रेश्माताईंचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण धनगर समाजात मुलींच्या शिक्षणाला अजूनही फारसे महत्त्व नाही. त्यांच्या या स्वप्नाला खऱ्या अर्थाने पंख दिले ते त्यांचे पती सूर्यकांत उर्फ सुरेशभाऊ टेळे यांनी. रेश्माताईंच्या जडणघडणीत सुरेशभाऊंचा सिंहाचा वाटा आहे.

एल.एल.बी.चे शिक्षण च नव्हे तर ऐन परीक्षेच्या काळात त्यांना नगरसेविका पद गमवावे लागले. पण त्या खचल्या नाहीत. त्यांच्यासाठी ही दुसरी अग्निपरीक्षा होती.

त्या सलग ३ वर्षे दररोज पहाटे स्वयंपाक करून मुलांना आवरून सकाळी 7 वाजता माळशिरस-फलटण बस प्रवास करून कॉलेज करत होत्या. त्याचबरोबर घर, राजकारण ऍक्टिव्हिटी, मेडिकल सांभाळणे, मुलांचा अभ्यास, घरकाम, नातेवाईक आणि सामाजिक, राजकीय अशा सर्व जबाबदाऱ्या पेलत होत्या.

माहेर-सासर दोन्हीकडे पहिली रेश्माताई या माहेरी तरंगफळ गावातील पहिल्या महिला वकील आहेत. टेळे परिवार आणि नातेवाईकांमधीलही त्या पहिल्या महिला विधीज्ञ आहेत. त्याचप्रमाणे माहेर-सासर दोन्हीकडून राजकीय क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या पहिल्या महिला नगरसेविका म्हणूनही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

रेश्माताईंचा संदेश_
“एक स्त्री घर सांभाळते ही जुनी कल्पना आहे. पण स्त्री घर, समाज, राजकारण आणि शिक्षण सगळं सांभाळू शकते हे मी सिद्ध केले. संधी मिळाली तर प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालू शकते” जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक, राजकीय कार्य करणाऱ्या जिद्दी व कर्तुत्ववान महिलेला बारामती झटका परिवार यांचे कडून लाख लाख शुभेच्छा..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button