कण्हेर ग्रामपंचायत निवडणुकीत एका गटाची प्रतिष्ठेची तर दुसऱ्या गटाची अस्तित्वाची अटीतटीची निवडणूक सुरू
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ग्रामपंचायतीच्या गतवेळच्या निवडणुकीत धनगर – मराठा अशी निवडणूक झालेली होती. यंदाच्या निवडणुकीत दोन्हीही सरपंच पदाचे उमेदवार धनगर समाजाचे असून आडनाव माने आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या कण्हेर ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या व रंगतदार पंचवार्षिक निवडणुकीत माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच गौतमआबा माने गटाची प्रतिष्ठेची तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील समर्थक यांच्या अस्तित्वाची अटीतटीची निवडणूक सुरू आहे. कण्हेर ग्रामपंचायतीच्या गतवेळच्या निवडणूकीत धनगर मराठा अशी निवडणूक झालेली होती. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार धनगर समाजाचे असून विशेष म्हणजे दोन्हीही उमेदवारांचे आडनाव माने आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच गौतम आबा माने यांची कण्हेर ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वर्षाची एक हाती सत्ता होती. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2018 साली थेट जनतेतील सरपंच पदासाठी मराठा समाजाच्या सौ. मंदाकिनी हनुमंत काळे व मोहिते पाटील गटाकडून धनगर समाजाच्या यांच्या सौ. सुनंदा पोपट माने यांच्यात लढत झालेली होती. धनगर समाजाचे गावात प्राबल्य असल्याने निवडणुकीत मराठा – धनगर असे चित्र तयार होऊन सुनंदा माने 475 मताधिक्याने विजयी झालेल्या होत्या. प्रभाग क्र. एक, दोन, तीन आणि चार यामध्ये सुनंदा माने यांना लीड होते तर, प्रभाग क्र. पाचमध्ये मंदाकिनी काळे यांना लीड होते.
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतील सरपंच पदाचे गौतम आबा माने गटाचे कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. बाजीराव महादेव माने व मोहिते पाटील समर्थक गटाच्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ. सोनल दत्तात्रय माने यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. यंदाच्या निवडणुकीत थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार दोन्हीही धनगर समाजाचे असून विशेष म्हणजे आडनाव दोन्हीही उमेदवारांचे माने आहे.
दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. दोन्हीही गटाच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आलेला आहे. दोन्हीही गटाकडून मतदारांना मनपसंत भोजन देऊन लक्ष्मी दर्शन सुरू आहे. कण्हेरसिद्ध व लक्ष्मी अंबाबाई यांच्या परड्यांची शपथ घेऊन मतदार आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गतवेळच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाकडून धनगर-मराठा असा अपप्रचार करण्यात आलेला होता. त्यामुळे पंधरा वर्षाची सत्ता परिवर्तन झालेले होते. अशी गावात व तालुक्यामध्ये चर्चा झालेली होती.
सध्या दोन्हीही उमेदवार धनगर समाजाचे असल्याने विशेष म्हणजे माने आडनाव आहे. यामुळे गौतम आबा माने गटाच्या प्रतिष्ठेची तर मोहिते पाटील समर्थक गटाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. दोन्हीही गटाकडून सर्व जाती धर्मातील लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. गौतम आबा माने गटाकडील तीन इतर समाजाचे उमेदवार थेट धनगर समाजाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. गौतम आबा माने गटात अनेक नेते व कार्यकर्ते सत्ता परिवर्तन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तर मोहिते पाटील समर्थक गटातील सर्व नेते मंडळी एकत्र येऊन धर्मराज माने यांचे नाव मतपत्रिका व पोस्टर यांच्यावर देण्यात आलेले आहे. कण्हेर गावामध्ये माने आडनाव असणारे जास्त मतदार आहेत. दोन्हीही गटाचे पॅनल प्रमुख माने आहेत. सरपंच पदाचे उमेदवार माने आहेत. दोन्हीही गटात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी माने उमेदवार आहेत. दोन्हीही गटाला समसमान संधी आहे. दोन्हीही गटाकडून मतदारांना खुश करण्यासाठी जेवणावळी व लक्ष्मी दर्शन देऊन दिवाळी सुरू आहे. अशा चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
गत निवडणुकीत मोहिते पाटील गटाकडे असणारे कपबशी चिन्ह यंदाच्या निवडणुकीत गौतम आबा गटाकडे घेतलेले आहे. मोहिते पाटील समर्थक सत्ताधारी गटाकडे शिट्टी चिन्ह आलेले आहे. त्यामुळे गावातील मतदार शिट्टीचा आवाज वाढवतील ? का कपबशीला प्राधान्य देतील ?, यावर दोन्हीही गटाचे तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने अस्तित्व सिद्ध होणार आहे. या निवडणुकीत दोन्हीही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यशस्वी होणाऱ्या गटाचे राजकीय कौशल्य तालुक्याला पहावयास मिळणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.