कर्णकर्कश (फटाका बुलेट) बुलेटस्वारांनो सावधान आवाज काढाल तर जप्त करून आवर घालणार – पोलीस निरीक्षक निरज उबाळे,

अकलूज (बारामती झटका)
अकलूज शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाद्वारे शहरवासीयांना तसेच ग्रामस्थांना त्रस्त करून सोडणाऱ्या बुलेटस्वारांवर शहर पोलीसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निरज उबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मोहीम उघडून बुलेटस्वारावर व अवैध नंबर प्लेटवर कारवाई करावी.
विशेष म्हणजे महाविद्यालय, कोचिंग क्लासेस या ठिकाणी विद्यार्थिनींचे छेड काढण्यासाठी या रोडरोमिओचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. दुचाकीच्या स्ट्रोकचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी सायलेन्सरचा वापर केला जातो. येथे मात्र सायलेन्सरची व्याख्याच काही बुलेटस्वारांनी बदलून टाकली आहे. कर्कश आवाज करणारी यंत्रणा असलेल्या विशिष्ट सायलेन्सरचा वापर करून बुलेटस्वार रस्त्यावर रात्री बेरात्री फिरत असतात. फटाके फुटल्यासारखे आवाज करीत असल्याने या बुलेटला ‘फटाका बुलेट’ असेही म्हटले जाते. विद्यार्थिनीमागे फिरणारे रोडरोमिओ, टवाळखोर, समाजकंटक, मद्यपी युवक अकारण प्रचंड वेगाने बुलेट पळविणारे हौशी तरुण यांचा मोठा उपद्रव शहरात होत आहे.

रात्री बेरात्री शहरातील कॉलनी, परिषद आणि प्रमुख रस्त्यावरून फिरणाऱ्या बुलेटमुळे शांतता भंग होऊन ध्वनी प्रदूषण होते व वयोवृद्ध नागरिकांत घबराट होत आहे. नागरिकांना त्याचा त्रास वाढला आहे. त्यामुळे काही नागरिकांनी पत्रकारांशी याबाबत संपर्क साधून या विषयावर संबंधिताचे लक्ष वेधण्याची मागणी केली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने दखल घेऊन पो. नि. निरज उबाळे यांनी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अनेक विद्यार्थी हे बुलेट गाडीचे फटाके काढण्यात धन्यता मानत आहेत. यामध्ये बुलेटसारख्या 350/500 सीसी पॉवरच्या गाडीचे चालू इंजिन एका सेकंदाच्या आत बंद करून परत चालू केले जाते, जेणेकरून या प्रोसेसमुळे इंजीनमधून खूप मोठा फटाका फुटल्यासारखा आवाज येतो. त्यामुळे हे मुलांच्या मुलींच्या शेजारून जाताना वारंवार केले जाते परंतु, हे करताना इतर मुलांना तर त्रास होतोच परंतु, इंजिनमध्ये बिघाड होऊन अपघात होण्याचीही दाट शक्यता असते.
सहकारी व सहाय्यक निरीक्षक, दामिनी पथक आणि शोधपथकाला सोबत घेऊन अशा ‘फटाका बुलेट’ जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करून योग्य ती कडक कारवाई करणार व संबंधितावर तात्काळ कारवाईचे आदेश देऊन नाकाबंदी करून पोलीस प्रशासनाला सक्रिय करणार तसेच पालकांनीही पाल्य चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना, याकडेही लक्ष दिले पाहिजे. – निरज उबाळे पोलीस निरीक्षक अकलूज

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



