माढ्यातून खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या ‘उमेदवारीस’ मिळाले आणखी बळ
माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
माढा (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाणार, की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात लाखमोलाचे योगदान दिलेल्या मोहिते पाटील परिवाराकडून यावेळी धरलेला उमेदवारीचा हट्ट भाजप पुरा करणार का, याची उत्सुकता या मतदारसंघात शिगेला पोहोचली आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळेल, असे स्पष्ट संकेत देत असतानाच दुसरीकडे मोहिते पाटील समर्थक विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील समर्थक यांना पर्याय नाही. मोहिते पाटीलच खासदार होणार अशी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर व्यक्त करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर देखील निशाणा साधताना दिसून येत आहे.
याचवेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महायुतीत आल्याने माढा आणि करमाळा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रभावी भूमिका बजावलेल्या आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्या रूपाने मोठे पाठबळ मिळाले आहे. याचवेळी पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील परिचारक समर्थक देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठी मदत करू शकतात. दुसरीकडे सांगोला मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी उमेदवार म्हणून आपला मोहिते पाटलांना विरोध असेल तर खासदार निंबाळकर यांना आपला पाठिंबा असेल, असे ठणकावून सांगितले. तिकडे माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दोस्ती राज्याला माहिती आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे होम ग्राउंडवर असलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केवळ साडेबाराशे मतांनी लीड मिळाले होते. मात्र सिंचन योजनेसह विविध विकासकामे मार्गी लावल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात एक प्रबळ राजकीय गट म्हणून ओळखला जाणाऱ्या रश्मी दीदी बागल यांचा भाजप प्रवेश मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. हा प्रवेश घडवून आणण्यात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रभावी भूमिका पार पाडल्याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. या पक्ष प्रवेशामुळे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बळ आणखी वाढले असून उमेदवारीबाबतचा दावाही आणखी बळकट झाला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.