मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीला यश; निवृत्त पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये सन्मान निधी मिळणार

मुंबई (बारामती झटका)
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून राज्यातील अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारा दरमहा ११ हजार रुपये सन्मान निधी वाढवून तो २० हजार रूपये करण्यात यावा, ही मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने लावून धरलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली आहे. त्यानुसार आता निवृत्त पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये सन्मान निधी मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील निवृत्त पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून राज्यातील निवृत्त पत्रकारांना दरमहा ११ हजार रूपये सन्मान निधी दिला जातो. ही रक्कम तुटपुंजी असल्याने त्यात वाढ करून २० हजार रूपये करण्यात यावी, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सन्मान निधीत वाढ करून २० हजार रूपये करण्याची घोषणा केली होती. अनेक महिने उलटून गेले असतानाही याचा शासन निर्णय जारी करण्यात आला नव्हता. यामुळे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिका-यांनी वारंवार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून या मागणीचा पाठपुरावा केला होता. विधानपरिषदेत सदस्यांच्या मार्फत हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी संघाने पुढाकार घेतला होता. मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित शासन निर्णय दोन दिवसात जारी करण्याची घोषणा विधान परिषदेत केली होती. त्यानंतरही यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रविण पुरो यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांना जाब विचारत घेराव घातला होता.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी शासन निर्णय जारी होईपर्यंत पाठपुरावा केला. अखेर सन्मान निधीत वाढ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यामुळे आता राज्यातील निवृत्त पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय्य मिळेल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.